अजित पवारांनी मुलाला दिला शेतीचा सल्ला : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे नुकतेच समोर आले आहे. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यात त्यांनी अजित पवारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत भाष्य केलं आहे. राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार यांनी मुलांशी संपर्क साधला होता. मुलांना त्यांनी राजकारण न करता शेती करण्याचा सल्ला त्यांनी दिला असा असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.

‘राजकारण करण्याऐवजी शेती करण्याचा मुलांना सल्ला’
पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “अजित पवारांशी माझा संपर्क झाला नाही. पवार कुटुंबात कोणताही वाद नाही. त्यांनी राजीनामा का दिला हे मलाही जाणून घ्यायचे आहे. आम्ही सर्व पवार भावंडं एकीने राहतो. राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार मुलांशी बोलले होते. मुलांना त्यांनी राजकारण करण्याऐवजी शेती करण्याचा सल्ला दिला” असे पवारांनी सांगितले.

‘राजीनाम्याचे कारण मलाही जाणून घ्यायचे आहे’
पुढे ते म्हणाले, “राजकारणाची पातळी घसरल्यानं अजित पवार नाराज झाले आहेत. त्यांनी राजीनामा देण्याविषयी कोणाशीही चर्चा केली नाही. माझा त्यांच्याशी राजीनामा देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर कोणताही संपर्क झाला नाही. सकाळपासून त्यांची आणि माझी भेटही झाली नाही. गलिच्छ राजकारणामुळं ते अस्वस्थ होते. त्यांच्या राजीनाम्याचे कारण मलाही जाणून घ्यायचे आहे.” असे पवार म्हणाले.

ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट देण्याची खेळी संपत नाही तोच राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला. या राजीनामा नाट्यानंतर अजित पवार हे नॉट रिचेबल झाले. परंतु अजित पवारांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून राजीनामा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.