महाआघाडीने ‘स्वाभिमानी’ला गृहित धरू नये : रविकांत तुपकर

वाशीम : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी या सरकारच्या विरोधातील सर्वांनी महाआघाडीमध्ये येऊन देशात व राज्यात सत्तापरिवर्तन करावे ही राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे नुकत्याच पाच राज्यांतील निवडणुकांमधील विजयाने हुरळून न जाता काँग्रेस व महाआघाडीतील इतर घटक पक्षांनी आगामी निवडणुकांकडे पाहावे.

भाजपाला सत्तेबाहेर घालविण्यासाठी स्वाभिमानीशिवाय पर्याय नसून महाआघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला गृहीत न धरता सन्मानजनक जागा देण्याची गरज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. स्थानिक शासकीय विश्रामभवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

यावेळी अधिक माहिती देताना तुपकर म्हणाले, शेती उत्पादनात वाढ, शेतमालाला हमीभाव व सरसकट कर्जमाफीचे गाजर दाखवून सत्ता बळकावणाऱ्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये बळीराजाच सत्ता परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळला असूनही शासनाकडून दुष्काळी उपाययोजना राबविल्या जात नाहीत. शासनाला निवेदन, उपोषण, शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलनाची भाषा समजत नाही. तेव्हा शासनाला जागे करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना जानेवारीत ऊस आणि दूध आंदोलनाच्या धर्तीवर राज्यात दुष्काळी प्रश्नावर आंदोलन हाती घेणार आहे.

वाशीम येथील खरेदी-विक्री संस्थेच्या संचालकांविरुध्द गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल असले तरी शेतकऱ्यांचे चुकारे प्रलंबित आहेत. प्रशासनाने गैरव्यवहार करणारांच्या संपत्तीवर टाच आणून शेतमालाचे चुकारे अदा करावेत. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील घरासमोर लवकरच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.