अफवांवर विश्वास ठेवू नये : पोलीस अधीक्षक सुवेझ हक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मागील काही दिवसांपासून काही समाज कंटक सोशल मिडीयाचे माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले, अशा प्रकारच्या अफवा पसरवित आहेत,अशा अफवांवर जिल्ह्यातील जनतेने विश्वास ठेवू नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी केले आहे.

सोशल मिडीयाचे माध्यमातून मुले चोरणारी टोळी आपल्या भागात आहे, अशा अफवांमुळे काही जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तर काही घटनांत खून झाले आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा प्रकारची अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर असला कोणताही मेसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. अफवा पसरविणाऱ्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांचे लक्ष आहे. अफवा पसरविण्यास हातभार लावल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर पुणे पोलीसांची करडी नजर असून असे चुकीचे मेसेज प्रसारित करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस दलामार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल. जिल्हयातील जनतेने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच अशा प्रकारच्या अफवा फसरविणाऱ्या व्यक्तिंची माहिती पुणे ग्रामीण मुख्य नियंत्रण कक्षास दूरध्वनी क्रमांक 25651127, 25657171,25657172,100 तसेच हेल्पलाईन क्रमांक 1091 या नंबरवर अथवा नजिकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहनही हक यांनी केले आहे.