Coronavirus : ‘तंबाखू अन् दारूपासून दूरच रहा, नाहीतर धोका वाढणार’ : आरोग्य मंत्रालय

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच राहण्याशिवाय पर्याय नाही. सुरक्षिततेसाठी तंबाखू आणि दारुचे सेवनही करु नका. नाहीतर तुमची प्रकृती बिघडून प्रतिकारक्षक्ती कमी होण्याचा धोका आहे, अशा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे..

लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागत आहे. त्यामुळे नकारात्मक भावनांपासून स्वतःला दूर ठेवा. यासाठी आवडते संगीत ऐका, पुस्तके वाचा, टिव्हीवर मनोरंजनाचे कार्यक्रम बघा. त्याचबरोबर पेंटिग्ज बनवणे, बागकाम करणे किंवा कपडे शिवणे, जुने छंद असतील तर पुन्हा करण्यास सांगितले जात आहे. दरम्यान, घरी असताना दारु, सिगारेट, तंबाखूचे वारंवार सेवन केल्यास कोरोनाचा धोका वाढण्याचा इशारा मंत्रालयाने दिला आहे.

सोशल डिस्टंसिंगमुळे चिंता आणि ताण निर्माण होत असल्यास त्यावर कशी मात करावी याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसार, जे कोरोनानेग्रस्त आहेत त्यांच्याबाबत चुकीचे मत बनवू नका असे आवाहन या पुस्तिकेतून करण्यात आले आहे. स्वतःला करोनाची लागण झाली असेल तर घाबरुन जाऊ नका. मोठ्या प्रमाणावर लोक यातून बरे होत आहेत. मात्र, यावर डॉक्टरांनी सांगितलेली औषध वेळेवर घ्या आणि स्वतःला आयसोलेशनमध्ये टाकून घ्या.