पावसात खंड असल्याने पेरणीची घाई नको; पावसाची प्रतीक्षा करावी – कृषी विभाग

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईन

राज्यात दि.१० जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होणार असले तरी दि.१२ जूनपासून पावसात काही कालावधीचा खंड राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दि. १२ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. अशीच स्थिती मध्य महाराष्ट्रात असेल. ढगाळ वातावरण राहणार असल्याने तापमानात घट होईल. परंतु १२ तारखेनंतर पुन्हा तापमान वाढेल. दरम्यान, दि. १० जूनपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे याभागात दि. ८ ते ९ जून या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सुद्धा दि. ९ आणि १० जून रोजी मुसळधार पाऊस असेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे.