शेतकऱ्यांच्या अनुदानातून बँकांनी कर्जाचे हप्ते घेऊ नयेत : मुख्यमंत्री

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे तातडीने सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना सक्त सूचना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार) नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ‘ऑडीओ ब्रीज सिस्टम’द्वारे नाशिक जिल्ह्यातील सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधून त्यांच्याशी दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. तसेच गावागावांमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या अडचणी समजून घेतल्या. या संवादात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आदींचाही सहभाग होता.

मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने टंचाईसंदर्भातील कोणत्याही प्रस्तावावर विनाविलंब निर्णय घ्यावा. प्रशासन आणि लोकांच्या एकत्रित सहभागातून या परिस्थितीवर निश्चित मात केली जाईल. त्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरपंचांनी गावातील पाणी टंचाई, चाऱ्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न अशा विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. त्याची तातडीने दखल घेऊन सरपंचांनी मांडलेल्या प्रश्नांवर गतीने कार्यवाही करण्यात यावी आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आपणास सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित विविध अधिकाऱ्यांना दिल्या.