पवारांकडून माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : वृत्तसंस्था – दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केला होता. त्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शरद पवार माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण करत आहेत, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

शरद पवार यांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘जुन-जुलैमध्ये चांगला पाऊस झाला, त्यामुळे पीक चांगलं येईल असं वाटलं, पण परिस्थिती बदलली. कधी नाही तेवढी मदत केंद्राने जाहीर केली. पण केंद्राच्या पैशांची वाट न बघता आम्ही मदत केली. टँकर देण्याची पद्धत बदलली आणि २४ तासात पाणी देण्याचं नियोजन केलं. जून अखेरपर्यंत पुरेल इतका चाऱ्याचा साठा आहे. तरीही शरद पवार सरकारवर टीका करत आहेत. अपुर्‍या माहितीच्या आधारे बोलत ते आहेत. शरद पवारांना काय झाले माहीत नाही, ते काहीच मानायला तयार नाहीत, त्यांची चिंता वाटते. दुष्काळाचे गणित ठरलेले असते, तरीही अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे हा राजकारणाचाच भाग आहे. दुष्काळाच्या राजकारणाने वातावरण विचलित होत आहे.राजकारण करण्यापेक्षा दुष्काळात सर्वांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे.’

पवार यांनी टीका-टिपणी करण्याऐवजी सूचना कराव्यात, आणखी काय करायला हवे ते सांगावे, त्यांच्याच काय; पण सर्वसामान्य शेतकर्‍याने जरी सूचना केली, तर त्या स्वीकारण्याची भूमिका आहे, असेही पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार
परतीचा पाऊस न पडल्याने राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे . दुष्काळात पिण्याचं पाणी, लोकांना रोजगार, पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या याची व्यवस्था सरकारने करावी. या दुष्काळात राज्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. आमचे सरकार असताना फळबागा वाचवण्यासाठी अनुदान दिले होते. निवडणूक आयोगातील नियमावली दुष्काळी कामात आड येत नाही.

Loading...
You might also like