माझे ‘त्या’ पोशाखातील फोटो फ्लेक्सवर लावू नका : अमोल कोल्हे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन : छत्रपती संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो फ्लेक्सवर लावू नका, असे आवाहन अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.अमोल कोल्हे यांनी केले आहे. पिंपरी येथे बोलतांना त्यांनी हे आवाहन केले.

आगामी लोकसभा – विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे नेते अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला राम राम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान राजकीय सभेच्या फ्लेक्सवर छत्रपती संभाजी महाराजांच्या पोशाखातील फोटो वापवरण्यात आला होता. त्यावेळी त्यांना शिव-शंभूप्रेमींची नाराजी वाढत चालली होती.काही मंडळींनी थेट अमोल कोल्हे यांना संपर्क साधून नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, संभाजी महाराजांची भूमिका करत असलो तरी मी त्यांचा केवळ मावळा आहे. संभाजी महाराजांच्या मालिका हे राजकारण नाही. त्यामुळे संभाजी महाराजांच्या पोशाखातील माझे फोटो कुठेही लावू नका. असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे, अमोल कोल्हे यांनी नुकताच शिवसेनेला राम राम ठोकला असल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी झाली आहे.