सावधान ! थर्टीफर्स्टला ‘हे’ कराल तर खावी लागेल जेलची हवा

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – अलिकडे सोशल मीडियावर थर्टीफर्स्टची पार्टी मागताना अनेकजण तुका म्हणे किंवा इतर संतांच्या अभंगांची मोडतोड करून चेष्टा करत असतात. आता अशा प्रकारची चेष्टा महागात पडणार आहे. थर्टीफर्स्टपूर्वी अशाप्रकारचे लिखाण सोशल मीडियावर केले जात असल्याने वारकरी सांप्रदायाने त्याची गंभीर दखल घेतल्याचे दिसत आहे. संत नामदेव, तुकाराम वारकरी परिषदेने दिलेल्या तक्रारीनंतर अशा प्रकारच्या हरकतीनंतर पोलीस कायदेशीर गुन्हा दाखल करणार आहेत.

वर्षअखेर आल्यानंतर व्हॉट्सॲप, हाइक, फेसबुक किंवा इतर सोशल साइट्सवरून ३१ डिसेंबरनिमित्त पार्टी मागण्याच्या निमित्ताने तारतम्य न बाळगता संतांच्या नावाने अभंग किंवा कविता पाठवून धार्मिक, सामाजिक भावना दुखावण्याची कृत्ये सोशल मीडियात घडत असतात. अशा कृत्यांना कायद्याने रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जगद्गुरू संत तुकाराम किंवा इतर संतांच्या नावे जर सोशल साइट्सवरून बदनामीकारक किंवा चेष्टेने वाक्यरचना केल्यास कलम २९५ नुसार कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकतो. अखिल भारतीय वारकरी मंडळ, मुंबई, तसेच संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेने केलेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे सोशल साइट्सवरून धार्मिक भावना दुखावणारे संदेश पसरणे महागात पडणार आहे.