राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल होवू नका : शरद पवार

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

आज देशात परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान केल्याशिवाय रहायचं नाही या निष्कर्षापर्यंत या देशातील सर्व पक्ष आले आहेत. त्यामुळे राज्य गेल्यावर गलितगात्र व्हायचं नाही आणि राज्य आल्यावर मस्तवाल व्हायचं नाही असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांना दिला.

कोकण पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय( कवाडे गट ), सपा यांच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा आज नवी मुंबईच्या विष्णूदास भावे सभागृहात पार पडला.

या मेळाव्यात शरद पवार यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यांनी सत्ता आलेल्या भाजपाचा मस्तवालपणा वाढल्याचे सांगत काँग्रेस, तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आणि आमदारांवर धाडी टाकून कसे दबावतंत्र भाजप टाकत आहे आणि केंद्रातील सत्तेचा कसा दुरुपयोग करत आहे. शिवाय उदयोग क्षेत्रात सरळमार्गाने काम करणाऱ्या उदयोगांनाही कसा त्रास दिला जात आहे याची माहिती दिली. कर्नाटकमध्ये सत्तेचा वापर करुन दबाव टाकत धाडी टाकण्यात आल्या मात्र कर्नाटकमधील जनतेने त्यांच्या दबावाला भीक घातली नाही. दुसरीकडे देशाचे अर्थमंत्री राहिलेले पी.चिंदबरम यांच्यावर खटला भरुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांचे देशासाठीचे योगदानही हे लोक लक्षात घेत नाहीत. तर कोलकाताच्या ममता बनर्जी या दहा बाय दहाच्या खोलीत रहातात. त्यांचं कामही लोकांसाठी सुरु आहे. तिथे त्यांनी भाजपाची डाळ शिजू दिली नाही म्हणून केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत त्यांच्या लोकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. असं कधी केंद्रातील सरकारने केल्याचं ऐकलं आहे का? असा सवाल शरद पवार यांनी करत भाजप सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला.

त्यांनी या देशात उदयोग क्षेत्रात टाटा उदयोग समुहाचं योगदान चांगलं आहे. त्यांचं कुटुंब ठराविक रक्कम लोकांच्या हितासाठी वापरते. त्यासाठी त्यांची एक ट्रस्ट आहे. त्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. याचा अर्थ हा आहे की, उदयोगातील घराणे सरळमार्गाने जात आहे. त्यांना नमवण्याचे काम सध्या भाजप सरकार करत आहे असेही पवार म्हणाले.

आज महाराष्ट्रातील चित्र बदलतंय याची प्रचिती मला येत आहे. लोकं आज पर्याय मागत आहेत. त्यामुळे परिवर्तन घडवायचं असेल तर एका विचाराचे लोक एकत्र यायला हवेत असेही पवार म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये पालघर,भंडारा-गोंदिया निवडणूकांमध्ये घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला आणि त्यांनी गोंदियाच्याबाबतीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ज्या पध्दतीने वागले आहेत त्याची संपूर्ण माहिती आम्ही लेखी स्वरुपात मिळवली असून लवकरच निवडणूक आयोगाची भेट घेवून त्यांना माहिती देणार असून त्यांनी आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचे बाहुले बनू नये असे सांगणार असून त्यांनी वेळीच सुधारणा केली नाही तर आम्ही त्यापुढील न्यायालयीन लढाईही लढणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्यभिषेक सोहळयाबाबत सांगतानाच त्यांच्या कार्याचे स्मरण केले. छत्रपतींना कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. तरी त्यांनी स्वराज्य घडविले. रयतेचे राज्य निर्माण केले याची आठवण करुन दिली.

कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या पाठीशी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. शिक्षक मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये जशी दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली तशी ताकद नजीब मुल्ला यांच्या पाठीशी उभी करा असे आदेश पवार यांनी दिले. याशिवाय त्यांनी पदवीधर मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधावा असेही पवारांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या काळापासून फंदफितुरी पाचवीला पुजलेली होती. ती फंदफितुरी शिवाजी महाराजांनी मोडून काढली. आपण कोकण पदवीधर निवडणूकीमध्ये ताकदीने काम केले तर ज्या प्रवृत्ती पक्ष सोडून गेल्या आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय ही फंदफितुरी संपणार नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नवी मुंबईच्या मेळाव्यात डावखरे यांचे नाव न घेता केली.

महाराष्ट्रात भविष्यात काय घडू शकते याची चुणुक आजच्या या मेळाव्यातून दिसत आहे. पालघर ते सिंधुदुर्गपर्यंतच पदवीधर मतदार हा आपल्या विचारांचा आहे. त्यामुळे तो कुणाच्या बाजुने जाईल असे वाटत नाही. आज सर्व पक्षांनी एकत्र येवून उत्तर देण्याची गरज आहे असे सांगतानाच ठाणे, पालघरमध्ये आघाडीने एकत्रित ताकद दाखवली तर भविष्यात विधानसभेचेही चित्र पालटायला वेळ लागणार नाही असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

इतर पक्षात जास्त काम करणाऱ्याच्या पाठिशी ईडीचा ससेमिरा लावून त्यांना भाजपात प्रवेश देण्याची पध्दत अवलंबली जात आहे अशी जोरदार टिका जयंत पाटील यांनी केली. आज भाजप पडेल ती किंमत मोजून निवडणूका लढवत आहे. त्यामुळे गाफिल न रहाता शेवटच्या मतापर्यंत पोचा. आपापल्या तालुक्यात उमेदवार पोचू शकला नाही तरी पदाधिकाऱ्यांनी काम करायचे आहे असे आदेशही जयंत पाटील यांनी दिले.

आजच्या सरकारच्या काळात तरुणाईला फार मोठया भ्रमनिरासाला सामोरे जावे लागले आहे आणि हीच तरुणाई येत्या पदवीधर निवडणूकीत आपली ताकद दाखवून देईल असा विश्वास आमदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. २०१९ मध्ये परिवर्तन घडत नाही तोपर्यंत गप्प बसायचे नाही असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.

आजच्या मेळाव्यातून येणाऱ्या निवडणूकीची भावी दिशा ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आघाडी करुनच निवडणूका लढवल्या जातील असे सांगतानाच आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.

कोकणच्या शिक्षक मतदारसंघात भाजपाची मक्तेदारी मोडून काढण्याचे काम आघाडीने केले आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणूकीतही त्यांची मक्तेदारी संपवली आणि आत्ता पदवीधर मतदार संघात विजय मिळवून हॅट्रीक करुया असा जबरदस्त आशावाद शेकापचे नेते आमदार जयंतभाई पाटील यांनी व्यक्त केला.

मेळाव्यामध्ये माजी मंत्री गणेश नाईक, उमेदवार नजीब मुल्ला, ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, आमदार भाई जगताप, आमदार शशिकांत शिंदे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, आमदार भास्करराव जाधव, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी यांनी आपले विचार व्यक्त केले.

कोकण पदवीधर मतदारसंघाचा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे गट ) आणि समाजवादी पक्ष यांचा संयुक्त मेळावा नवी मुंबईच्या विष्णूदास भावे सभागृहामध्ये पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस डि.पी.त्रिपाठी, सुनिल तटकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, शेकापचे आमदार जयंतभाई पाटील, माजी मंत्री भास्करराव जाधव, आमदार भाई जगताप, आमदार जितेंद्र आव्हाड, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी मंत्री शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार ज्योती कलानी, आमदार हेमंत टकले, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार नरेंद्र पाटील, आमदार संजय कदम, राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रमोद हिंदुराव, शेकापच्या मिनाक्षी पाटील, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार नजीब मुल्ला, ज्येष्ठ संपादक मधुकर भावे, धैर्यशील पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार,  उपमहापौर मंदा म्हात्रे, आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, काँग्रेस, शेकाप, आरपीआय, सपा पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते