चिंता करू नका पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार : अशोक चव्हाण

भोकर : पोलीसनामा ऑनलाईन – माधव मेकेवाड- नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने भाजप सरकार कडून जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवत असल्याचा अरोप माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भोकर येथे जनसंघर्ष यात्रे निमित्त आयोजित जाहीर सभेत केला.

भोकर येथे आज (शुक्रवार) काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा दाखल झाली. या निमित्ताने येथील मोठ्या मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, नसीम खान,आमदार अमीता चव्हाण, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर,बाजार समिती सभापती बी.आर.कदम आदी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले कि,साडेचार वर्षांत महाराष्ट्र अर्थिक अडचणीत होरपळत असून विकासाच्या नावाखाली राज्यातील सरकार थापाड्या मारत आहे. नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या सरकार कडून जाणीवपूर्वक विकासनिधी उपलब्ध केला जात नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्त्यांची वाट लागली असून खड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा अशी परिस्थिती असताना सरकार म्हणते रस्ते गूळगूळीत झाले.

जिल्ह्यातील अकराशे विद्युत रोहीत्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी असून पिकांना देणे जमत नाही. कुठे रोहीत्र उपलब्ध झाले तर त्याच्यात तेल नाही व जिथे सर्व आहे तिथे लाईट नाही अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा, बोड अळीचे पैसे मिळत नाहीत, जिल्ह्यातील आणेवारी जाणीवपूर्वक पन्नास टक्के्याहून अधिक दाखवून शेतकऱ्यांना अर्थिक लाभापासून वंचित ठेवले जात आहे.

गोदावरी खोऱ्यातील २९ टीएमसी पाणी शिल्लक असताना मराठवाड्यात नवीन तलावासाठी निधी मिळत नाही, यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत चिंता करू नका पुन्हा काँग्रेसचे सरकार येणार आहे. तेव्हा प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही. केवळ काँग्रेसच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

या वेळी आप्पाराव सोमठाणकर, सभापती जगदिश पाटील भोसीकर, जि.प.सदस्य प्रकाश भोसीकर, मंगाराणी अंबुलगेकर, बाळासाहेब रावणगावकर, गोविंद बाबागौड पाटील, नगराध्यक्षा संगीता चिंचाळकर, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी शेख युसुफ, नगरसेवक सुरेश पोकलवार, सुवर्णा वाघमारे, मनोज गिमेकर, नरसारेड्डी गोपीलवाड, गुलाब चव्हाण, बाबूराव सायाळकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. सभेचे सुत्रसंचलन संतोष देवराय तर आभार प्रदर्शन जगदीश पाटील यांनी मानले.