‘तान्हाजी’ करमुक्त करा, खा. भारती पवार यांची मागणी

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे खंदे सेनापती तानाजी मालुसरे यांच्‍या जीवनावर आधारीत तानाजी या चित्रपटाला करमुक्‍त करण्‍याची मागणी दिंडोरी लोकसभेच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी केली आहे. महाराष्ट्रात तानाजी चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

गड आला पण सिंह गेला असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यांच्या मृत्युनंतर काढले होते. तर, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं असं म्हणत तानाजी मालुसरे आपल्या कर्तव्यासाठी घरातून बाहेर पडले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठीजनांची अस्मिता या चित्रपटाबद्दल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष या चित्रपटातून मिळणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे घनिष्‍ठ मित्र आणि वीर निष्‍ठावान मराठा सरदार होते. तानाजी सारख्‍या वीर योध्‍द्याच्‍या जीवनावर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आजच्‍या पिढीसाठी प्रेरणादायी असा आहे. आधी लगीन कोंडाण्‍याचे मग रायबाचे असे म्‍हणत युध्‍दाला सामोरे जाणारे तानाजी आमच्‍या श्रेष्‍ठ मराठी संस्‍कृतीचा मानबिंदु आहे. या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांची प्रचंड पसंती सुध्‍दा मिळत आहे. या चित्रपटाला करमुक्‍त करुन शासनाने या वीर योध्‍द्याला मानवंदना द्यावी अशी मागणी खासदार भारती पवार यानी मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्‍याकडे केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा –