मनोहर पर्रिकर यांच्या पत्नीचेही निधन झाले होते कर्करोगानेच

पणजी : वृत्तसंस्था – गेल्या वर्षभरात स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे काल(रविवार दि 17 मार्च) निधन झाले. मनोहर पर्रिकर यांच्या पत्नीचेही कर्करोगानेच निधन झाले होते अशी माहिती समोर आली आहे. 2001 मध्ये मनोहर पर्रिकर यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. मेधा पर्रिकर असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. दरम्यान त्यांच्या निधनानंतर मनोहर पर्रिकरांनी त्यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करून त्यांना शिकवून मोठे केले.

2000 मध्ये मनोहर पर्रिकर पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले होते. ते स्कूटरवरून फिरत असत. गोव्यात अनेकदा लोकांना ते रांगेत भेटत असत. त्यांचा साधेपणा सर्वत्र प्रसिद्ध होता. पर्रिकर आपल्या साधेपणासाठी ओळखले जातात. दरम्यान गेल्या वर्षभरापासून मनोहर पर्रिकर हे त्यांच्या स्वादुपिंडाच्या कर्करोगावर अमेरिकेत आणि भारतात उपचार घेत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते त्यांच्या घरी आणि गोव्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत होते.

कर्करोगाने त्रस्त असूनही त्यांनी अशा अवस्थेतही काम करण्याची तयारी दाखवली. भाजपात त्यांनी मु्ख्यमंत्रीपद ते देशाचं संरक्षण मंत्री पद अशी कारकीर्द भुषवली. कर्करोगाशी लढत असतानाही उपचार घेत असतानाही पर्रिकर गोवा विधानसभेत आलेले अवघ्या देशानेच पाहिले आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावल्याचे दिसत होते. काल(रविवारी दि 17 मार्च) त्यांचा रक्तदाब कमी झाला. यामुळे त्यांना श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. रविवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

जसे त्यांचे निधन कर्करोगाने झाले तसेच त्यांच्या पत्नीचेही निधन कर्करोगानेच झाले होते. एक विचित्र योगायोग म्हणावा अशीच ही घटना आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांच्या निधनामुळी संपूर्ण गोव्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान पर्रिकर यांच्या निधनामुळे गोव्यात 7 दिवसांचा राजकीय दुखवटा पाळला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.