मधुमेहाविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहीत आहे का ?

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन –आपण पाहतो आहे की, बरेच लोक आजकाल फिटनेस आणि हेल्थकडे लक्ष देत आहेत अशातच अनेक लोक आपल्या तब्येतीकडे म्हणावे तसे लक्ष देताना दिसत नाही. यामुळेच माणूस आजकाल अनेक वेगवेगळ्या आजारांचा शिकार होताना दिसत आहे. त्यांना कमी वयातच आैषधांचा सहारा घ्यावा लागत आहे. अशाच अनेक आजारांपैकी एक आजार म्हणजेच मधुमेह होय. आज आपण खास मधुमेहाविषयी वाचणार आहोत कारण आज १४ नोव्हेंबर म्हणजेच आंतरराष्ट्रीय मधुमेह दिन आहे. महत्त्वाची बाब अशी की, जगभरात मधुमेही रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे आणि ही एक चिंतेची बाब आहे. आज मधुमेह दिनाचे आैचित्य साधून पोलीसनामाने डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांची मुलाखत घेतली आहे.

१४ नोव्हेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय मधुमेह दिन हा आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाकडून साजरा केला जातो. त्याचनिमित्ताने आतंरराष्ट्रीय  मधुमेह दिनानिमित्त डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी पोलीसानामाला मुलखात दिली. मधुमेह भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मूळ धरू पाहतोय. आज सध्य  स्थितीला भारताचा मधुमेही रुग्णांमध्ये तिसरा  क्रमांक लागतो आणि विशेष म्हणजे तरुणांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात बळावताना दिसतोय. यावर काय काळजी घ्यावी ? कुठली पथ्य पाळावीत याविषयी डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केले.

डॉक्टर म्हणाले की, “दैनंदिन जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. तरुणाई दिवसाला दहा- दहा कप चहा पिताना दिसते आणि हाताने आजार ओढवून घेताे. ज्यावेळी आपल्या कमरेचा घेर वाढू लागतो त्यावेळी मधुमेह होण्याची शक्यता बळावते. त्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहाराची गरज शरीराला आहे. अगदी साध्या साध्या  गोष्टींकडे लक्ष देऊन  मधुमेहाचा धोका टाळता येऊ शकतो. रोजच्या  जेवणात एका वाटीऐवजी २ वाट्या डाळ घेतली पाहिजे इतकेच नाही तर आपण हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे. विशेष म्हणजे या पालेभाज्यांसोबतच भाताचा आहारात समावेश करून मधुमेह टाळता येईल.”

“पुण्यामध्ये जवळजवळ ४०,००० मधुमेही रुग्ण आहेत आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढताना दिसत आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मधुमेहाला टाळता येऊ शकत” असेही डॉक्टर म्हणाले. त्रिपाठी यांनी अनेक मधुमेही रुग्णांना पूर्णपणे बरे केलंय. मधुमेहींसाठी ते वेळोवेळी वर्कशॉप  घेतात. मधुमेहासंदर्भात असलेले समज गैरसमज ते दूर करण्याचा प्रयत्न करतात. या कार्यशाळांमधून अनेकांना फायदा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.