उर्मिला मातोंडकर यांचे पती मोहसीन अख्तर मीर यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहीत आहे का तुम्हाला ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबईमधून उमेदवारीही देण्यात आली आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पती मोहसीन अख्तर मीर यांच्या चर्चेलाही उधाण आले आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ३ मार्च २०१६ रोजी मोहसीन अख्तर मीर यांच्याशी लग्न केलं. ते एक व्यावसायिक आणि मॉडेल आहेत. अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल परंतु, मोहसीन मीर हे उर्मिला यांच्यपेक्षा 9 वर्षांनी लहान आहेत.

मोहसीन मीर यांच्याशी लग्न केल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उर्मिला म्हणाल्या होत्या की, “आम्ही आमच्या लग्नात फक्त कुटुंबीय आणि मित्रांना बोलावलं होतं. कारण लग्न साध्या पद्धतीनं व्हावं अशी आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. त्यामुळे ते अत्यंत खासगी पद्धतीनं झालं.”

उर्मिला आणि मोहसीन यांचं लग्न सर्वप्रथम हिंदू परंपरेनुसार झालं होतं. त्यानंतर त्यांचा निकाहसुद्धा वाचण्यात आला होता. या दोघांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीनं झालं होतं. त्यांच्या लग्नाला प्रसिद्ध व्यक्तींपैकी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा उपस्थित होते.

मोहसीन अख्तर मीर कोण आहेत ?

मोहसीन अख्तर मीर हे एका व्यावसायिक कुटुंबातील आहेत. त्यांनी करिअरसाठी २१ व्या वर्षी घर सोडलं आणि मुंबई गाठली. मुंबईत येऊन त्यांनी मॉडेल विश्वातील आपल्या करिअरला सुरुवातही केली. मोहसीन यांनी तरुण कुमार, मनीष मल्होत्रा, विक्रम फडणिस, रन्ना गिल्ल यांचे ड्रेस परिधान करून रँपवॉक केला आहे. मुख्य म्हणजे मोहसीन मीर हे २००७च्या मिस्टर इंडिया स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

मोहसीन मीर यांनी चित्रपटातही आपलं नशीब आजमावून पाहिलं आहे. त्यांनी ‘लक बाय चान्स’ आणि ‘ मुंबई मस्त कलंदर’ या चित्रपटांत काम केलं आहे. मोहसीन यांना १ भाऊ आणि ३ बहिणी आहेत.

कसे भेटले मोहसीन आणि उर्मिला ?

मोहसीन मीर आणि उर्मिला मातोंडकर यांची भेट २०१४ मध्ये झाली. मनीष मल्होत्रा यांची भाची रिद्धी मल्होत्रा यांच्या लग्नात २०१४ मध्ये ते पहिल्यांदा भेटले. त्यानंतर त्यांची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग हळूहळू त्या दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. रामगोपाल वर्मा यांनी उर्मिला यांना ‘रंगीला’ चित्रपटा प्रथम काम दिलं होतं. या दोघांनी ‘रंगीला’, ‘कौन’ आणि ‘भूत’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

मोहसीन आणि उर्मिलाच्या लग्नानंतर रामगोपल वर्मा म्हणाले की…

चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी उर्मिला आणि मोहसीन यांच्या लग्नानंतर ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या ऊर्मिला मातोंडकर यांच्या लग्नाची बातमी ऐकून मला आनंद झाला आहे. त्यांचं जीवन नेहमीच रंगीला राहावं, ही माझी मनापासून इच्छा आहे” असे ते म्हणाले होते.