मोफत लसीकरणावरून सतेज पाटलांनी केंद्राला विचारला प्रश्न, म्हणाले – ‘पोलिओ लसीसाठी एक तरी पैसा…’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून लसीकरण मोहिमही मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. मात्र, आता प्रश्न आला तो म्हणजे ही लस यापुढील काळात मोफत द्यायची ची विकत? विकत घ्यायची झाल्यास तिची किंमत किती असेल त्याचा भार केंद्राला की राज्य सरकारला पेलावा लागणार यांसारखे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयांना ही लस ६०० तर केंद्र सरकारला ४०० रुपयांना देण्यात येणार असल्याचे सीरम इंस्टीट्यूटने सांगितले होते. त्यामुळे कोरोना लस मोफत द्यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मोफत लस वितरित करण्याचा मुद्दा उपस्थित करत काही ट्वीट केले आहेत. यामध्ये त्यांनी पोलिओ लसीकरणासाठी एक पैसा तरी घेतल्याचे आठवते का? असा सवालही उपस्थित केला आहे.

सतेज पाटील दोन ट्वीट केले आहे. पहिल्या ट्वीटमध्ये पोलिओ लसीकरणासाठी एक पैसा तरी घेतल्याचे आठवते का? असा प्रश्न करत केंद्रीय अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांनी लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केली होती आणि आवश्यकता भासल्यास आणखी तरतूद करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले होते. या ट्विटमध्ये त्यांनी निर्मला सीतारामण यांना टॅग करत # Free Vaccine for All हा हॅशटॅग वापरला आहे. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट केले त्यात त्यांनी नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार जे लसीकरणासाठी पात्र आहेत अशा ६० कोटी लोकांना १२० कोटी डोसेसची गरज आहे. दरम्यान, राज्य सरकारला उत्पादकांनी दिलेल्या लसीच्या किंमतीनुसार त्याची किंमत २४ हजार कोटींच्यावर असता कामा नये. त्यामुळे केंद्र सरकारने लसीची आवश्यकता असताना खर्च दिला पाहिजे. तसे होत नसेल, तर केंद्र सरकार राज्य सरकार आणि खासगी सेक्टरवर भार टाकून आपल्या जबाबदारीपासून का पळ काढत आहेत असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.