आपण यांना पाहिलत का ? ‘या’ भाजप आमदाराविरुद्ध लागले फलक

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. पुढील महिन्यात हि निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात पक्षांतर करताना दिसून येत आहेत. तसेच अनेक विधानसभा मतदारसंघात वातावरण तापलेले दिसून येत आहे. त्याचाच भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात देखील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी असणाऱ्या भाजप आमदारांना लक्ष्य करत पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

या ठिकाणी असलेले भाजपचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांना लक्ष्य करणारे अनेक फलक अज्ञात व्यक्तींनी मतदारसंघात ठिकठिकाणी लावले आहेत. आपण यांना पाहिलंत का? असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. त्याचबरोबर या दोघांचे फोटोदेखील या पोस्टरवर छापलेले आहेत.

तसेच खाली सौजन्य म्हणून या मतदारसंघातील सामान्य नागरिक असे देखील छापण्यात आले आहे.  त्याचबरोबर निवडून आल्यानंतर दुर्लभ झालेल्या नेत्याला तम्ही पुन्हा निवडून देणार का ? असा प्रश्न देखील या पोस्टरवर विचारण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील कुरघोड्यांचे तसेच चढाओढीचे राजकारण पुन्हा सुरु झाल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या जागावाटपावरून धुसपूस सुरु असून लवकरच जागावाटप पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे आघाडीने जागावाटपात आघाडी घेतली असून त्यांचा प्रचार देखील लवकरच सुरु होणार आहे.