खोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेटच्या नावाखाली होतेय फसवणूक

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गेल्या काही दिवसात आधार कार्ड अपडेटच्या नावाखाली फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे कार्डमध्ये बदल करताना, काही अपडेट करताना सावधानता बाळगणे गरजेेचे आहे. आधारसंबधीची माहिती अपडेट करताना UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरूनच करावी, जेणेकरून युजर्सची कोणतीही फसवणूक होणार नाही.

आधार कार्ड देशात सर्वात महत्वाचे ओळखपत्र मानले जात आहे. सध्या प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. याशिवाय नवीन मोबाईल सिम कार्ड खरेदी, मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी आणि बँकेत खाते उघडण्यासाठीही आधार क्रमांकाची गरज लागते. तसेच पत्त्याचा पुरावा म्हणूनही आधार कार्ड वापरले जाते. पण याचाच फायदा काही फसवणूक करणा-यांकडून घेतला जात आहे.

आधार अपडेटच्या नावाखाली काही खोट्या वेबसाईट्सद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. या वेबसाईट्सवर देखील कॉमन सर्विस सेंटरवर केल्या जाणाऱ्या प्रोसेसप्रमाणेच काम होते. त्यामुळे आधार कार्डवर कोणतीही माहिती अपडेट करायाची असल्यास UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरूनच करावी. त्यामुळे युजर्सची कोणतीही फसवणूक होणार नाही.

दरम्यान, सरकारने Cyber Dost या ट्विटर हँडलवर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केले आहे. सध्या फ्रॉस्टर्स लोकांना एसएमएस पाठवून त्यांचं बँक अकाउंट रिकामं करत आहेत. लोकांनी मेसेजवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही लिंकबाबतचा मेसेज आल्यास, त्वरित त्यांची तक्रार सायबर क्राईम पोलिसांकडे करावी, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.