अमेरिकेतील साथीच्या आजारांच्या डॉक्टरने भारताला दिला Lockdown चा सल्ला, कोविड रोखण्यासाठी सांगितला 3 स्टेप फॉर्म्युला

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – भारतात कोविडची स्थिती अनियंत्रित होत आहे. देशात सुमारे आठवडाभरापासून दररोज 3 लाखापेक्षा जास्त नवीन संक्रमित सापडत आहेत. याच दरम्यान जागतिक स्तरावर कोरोना व्हायरसवर काम करत असलेले डॉक्टर अँथोनी फाऊची यांनी भारताच्या स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देशात व्हायरसला रोखण्यासाठी काही आठवड्यांच्या शटडाऊनचा सल्ला दिला आहे. या दरम्यान त्यांनी देशात लसीकरणाच्या स्थितीवर सुद्धा चर्चा केली. डॉक्टर फाऊची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आहेत.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना डॉक्टर फाऊची यांनी देशात कोविड स्थिती नियंत्रित करण्यासाठी तीन टप्प्यांचा – तत्काळ, मध्यम आणि दिर्घ कालावधीच्या उपायांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, यावेळी लोकांना लस देणे अतिशय गरजेचे आहे. तर, ऑक्सीजन आणि इतर आरोग्य कमतरतांमधून बाहेर पडण्यासाठी त्यांनी आयोग किंवा आपत्कालीन गट तयार करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. त्यांनी म्हटले, हा आयोग किंवा गट प्लॅन बनवतील की, ऑक्सीजन कसा मिळवायचा आहे, कसा आपल्याला सप्लाय मिळेल, कशी औषधे मिळतील. डॉक्टर फाऊची यांनी जागतिक आरोग्य आणि अन्य देशांशी चर्चा करण्याचा सुद्धा सल्ला दिला.

मध्यम स्तरावर करण्यासाठी त्यांनी म्हटले की, हॉस्पिटल लवकरात लवकर बनवले जावेत. त्यांनी युद्धा दरम्यान बनवतात तशा फील्ड हॉस्पिटलसारख्या मॉडलचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी चीनचे उदाहरण दिले. सोबतच अमेरिकेचा अनुभव सांगत भारतात लष्कराची मदत घेण्याचा सल्ला दिला. यानंतर मोठ्या कालावधीच्या उपायांबाबत डॉक्टर फाऊची यांनी म्हटले की, जास्तीत जास्त लोकांना लस देणे आवश्यक आहे. त्यांनी म्हटले की, अगोदर तात्काळ स्वरूपाच्या अडचणी समजून घ्या, नंतर मध्यम स्तराच्या गोष्टी सुरू करा, यानंतर व्हॅक्सीन संबंधात मोठ्या कालावधीच्या उपायांबाबत विचार करा.

भारतात कोविड रोखण्यासाठी डॉक्टर फाउची यांनी लॉकडाउन आवश्यक असल्याचे सांगितले. वृत्तपत्राशी झालेल्या चर्चेत त्यांनी म्हटले की, तुम्हाला 3 महिन्याच्या शटडाऊनची आवश्यकता नाही. तुम्ही ट्रान्समिशन रोखण्यासाठी अस्थाई प्रकारचे शटडाऊन करू शकता. ते म्हणाले की, देश बंद करावा हे कुणालाही पसंत नसते, परंतु असे तेव्हा होते जेव्हा तुम्ही लॉकडाऊन तीन महिन्यासाठी करता. त्यांनी सांगितले की, जर तुम्ही ते काही आठवड्यांसाठी केलेत, तर त्याचा स्थितीवर खुप चांगला परिणाम होईल.