नगरमध्ये महिलेचा बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेचा बेकायदा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी डॉक्टर शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय-50) यांना अटक केली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.22) रात्री उशिरा केली. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा बेकायदा गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक महिला त्या ठिकाणी आढळून आली. चौकशी केली असता त्या महिलेचा गर्भपात केला असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना माहिती दिली.

डॉ. मुरंबीकर यांनी पथकासह हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केली. त्यावेळी डॉ. गंधे याने महिलेचा बेकायदा गर्भपात केल्याचे उघड झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि नगर तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी डॉक्टर गंधे याला अटक केली. गंधे याच्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.