क्लिनिकमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला बेड्या

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्लिनिकमध्ये कामाला असलेल्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा बळी बनविणाऱ्या एका डॉक्टरला एनआरआय पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याने यापुर्वीही उपचारासाठी आलेल्या महिला व कामासाठी असलेल्या तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

डॉ. संजय लाड (५५ वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. य़ाप्रकरणी १७ वर्षीय मुलीने तक्रार दिली आहे.

पिडीत मुलगी ही डॉक्टर लाड याच्या क्लीनिकमध्ये कामास होती. नुकतीच तिने बारावीची परीक्षा दिली आहे. सुट्टी सुरु झाल्याने तिने डॉ. लाडच्या क्लिनिकमध्ये कामास सुरुवात केली होती. १ एप्रिल रोजी दुपारी ती कामासाठी क्लिनीकमध्ये गेली. त्यावेळी डॉ. लाडने तिच्यावर अत्याचार केले. त्यामुळे मुलगी तणावाखाली आली होती. त्यानंतर तिने मडगावला जाणारी एक्सप्रेस पकडली. त्यावेळी प्रवासादरम्यान एक महिला प्रवाशाच्या लक्षात आल्यावर तिने तणावाचे कारण विचारत तिला बोलतं केलं. तिने घडला सर्व प्रकार महिलेला सांगितला. त्यानंतर महिलेने तिला पोलीसात तक्रार देण्यासाठी नवी मुंबईत पाठवून दिले. ही मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी क्लिनिकवर तिच्याबद्दल चौकशी केली तेव्हा ती दुपारीच घरी गेल्याचे डॉक्टरने सांगितले. त्यानतंर दुसऱ्या दिवशी ती घरी परतली. घरी आल्यावर तिने घडला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर एनआरआय पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर बुधवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला ठाणे सत्र न्यायालयाने ७ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वीही कामावर असलेल्या तरुणींना केले वासनेचा शिकार

डॉ. लाड हा बीएएमएस डॉक्टर आहे. त्याचे मागील २० वर्षांपासून सीबीडी बेलापूरमधील दिवाळे गावात क्लिनीक आहे. त्याच्याकडे कामावर असलेल्या अनेक तरुणींना त्याने यापुर्वी आपल्या वासनेचे शिकार बनविल्याचे तपासात कबूल केले. तसेच मोफत उपचार करून देण्यासाठी आलेल्या गरीब घरातील रुग्ण महिला व तरुणींना वासनेचे बळी बनविले, असे तपासात निष्पन्न झाले.