पत्नीकडे पन्नास लाखांची मागणी करणाऱ्या ‘त्या’ डॉक्‍टर व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नवीन दवाखान्यासाठी पत्नीकडे पन्नास लाखांची मागणी करणाऱ्या केडगावच्या डॉक्टर व त्याच्या कुटुंबियांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने शिक्षिका असलेल्या पत्नीला छळ करून घरातून हाकलून दिले.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉ. रवींद्रकुमार तुकाराम घुमटकर, सासू संजीवनी तुकाराम घुमटकर, दीर हेमंत तुकाराम घुमटकर (सर्व रा. साबण फॅक्टरी जवळ, शाहूनगर, केडगाव) यांचा समावेश आहे. याबाबत माहिती अशी की, १८ जुलै २०१६ ते दि. ५ डिसेंबर १७ रोजीपर्यंत दिपाली रवींद्रकुमार घुमटकर (वय ३३ वर्षे, धंदा- शिक्षिका रा, साबण फॅक्टरी जवळ, शाहू नगर, केडगाव, अहमदनगर, ह. रा. विशाल गणपती मंदिराजवळ, माळीवाडा, अहमदनगर) या सासरी नांदत असताना पती, सासू व दीराने ‘तू तुझ्या माहेरून ५० लाख रुपये नवीन दवाखाना उघडण्यासाठी घेऊन ये’, असे म्हणून मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून दिपाली यांना उपाशीपोटी ठेवून घराबाहेर काढले आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दिपाली घुमटकर यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गर्जे हे करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त