Aurangabad News : कोविड सेंटरमध्ये डॉक्टराचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न; डॉक्टर बडतर्फ

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपूरा येथील कोरोना उपचार केंद्रात मंगळवारी मध्यरात्री आयुष डॉक्टराने पॉझिटिव्ह महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी या डॉक्टराला गुरुवारी सकाळी बडतर्फ केले आहे.

पदमपूरा येथील कोरोना उपचार केद्रांत दोन दिवसांपूर्वी एक महिला रुग्ण दाखल झाली होती. या महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एक आयुष डॉक्टर तिला सतत फोन करीत होता. तुम्हाला उद्या डिसचार्ज देतो, त्यापूर्वी तुम्हाला माझे एक काम करावे लागेल, असे या डॉक्टरांनी तिला सांगितले. त्यानंतर मंगळवारी रात्री २ वाजता या डॉक्टराने तिला खाली बोलावून घेतले. तिला गच्चीवर नेण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला.

महिलेने त्याला विरोध करीत आरडाओरडा केला. ही बाब इतर रुग्णांना समजल्यावर कोविड केअर सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. इतर कर्मचार्‍यांनी धाव घेऊन मध्यस्थी केली. ही पिडित महिला रुग्णालयात रडत होती. या घटनेची माहिती त्वरीत नातेवाईकांना मिळाली. नातेवाईकांनी रुग्णालयात शिरुन त्या डॉक्टरला बेदम मारहाण केली. या घटनेवर रुग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य अधिकारी यांनी बोलण्याचे टाळले. बुधवारी या प्रकाराची माहिती महापालिका आयुक्त पाण्डेय यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल आज गुरुवारी सकाळी मिळताच आयुक्तांनी या डॉक्टराला बडतर्फ केले.विशेष बाब म्हणजे या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.