राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्टमुळे डाॅक्टरला मारहाण 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फेसबकु पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट केल्याबद्दल मनसैनिकांनी एका डाॅक्टरला चोप दिल्याची घटना समोर आली आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान राजकीय बळी असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरेंच्या या पोस्टवर सदर डाॅक्टरने आक्षेपार्ह कमेंट केली होती. त्याच्या या टीकेचा मनसैनिकांनी समाचार घेत त्याला चोप दिला आहे.

सदर मारहाण झालेल्या डाॅक्टरचे नाव शत्रुघ्न थोरात पाटील असून ते औरंगाबादच्या वैजापूरमधील रहिवासी आहेत. मुख्य म्हणजे मनसैनिकांनी या डाॅक्टरला चोप दिला. इतकेच नाही तर, मनसैनिकांनी या डाॅक्टरवर शाईदेखील फेकली. यादरम्यान, सदर डाॅक्टर माझी चूक झाली, माफ करा, अशी विनवणीही केली होती. परंतु त्याच्या विनवणीकडे कोणतेही लक्ष न देता मनसैनिकांनी त्याला मारहाण केली. त्याच्यावर शाई फेकली. इतकेच नाही तर, राज ठाकरेंविरोधात शिवराळ भाषा वापरल्याबद्दल त्याला जाबही विचारला. विशेष म्हणजे याबद्दल पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

नेमकी पोस्ट काय ?
सरकार सातत्याने निवडणुकीच्या तोंडावर पाक शत्रू आहे असे वातावरण भासवत आहे. तसेच पुलवामा हल्ल्यात जे 40 जवान गेले, त्याची माहिती पुढे येईलच, पण ते राजकीय बळी ठरले आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी गंभीर आरोप केला आहे. इतकेच नाही तर,  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या एका माणसाची कसून चौकशी झाली तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.