मुल होण्यासाठी औषध देण्याच्या नावाखाली ‘बोगस’ डॉक्टराकडून ‘फसवणूक’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – मुलबाळ होण्यासाठी औषधाने एक महिन्यात रिझल्ट देतो, असे सांगून एका तरुणाच्या गळ्यात ५१ हजार रुपयांची औषध मारुन भोंदुबाबाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी देहुरोड पोलिसांनी डॉ. करीम (वय ४०, रा़ कांदा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी विनोद कुमार (वय २९, रा़ अभिलाषा पार्क, देहुगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डॉ. करीम हे ६ जानेवारी रोजी विनोद कुमार यांच्या घरी आले होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला तपासून मुळबाळ होण्यासाठी औषध देतो व उपचार करतो, एक महिन्यात रिझल्ट देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने तपासणी फी म्हणून ४० हजार रुपयांची मागणी केली आहे.

तेव्हा विनोद कुमार यांनी त्यांना २४ हजार ५०० रुपये रोख दिले. त्यानंतर डॉ. करीम यांनी त्यांना मोबाईल करुन मेडिकलवाल्याचा नंबर दिला व तेथे जाऊन औषधे घेण्यास सांगितले. त्यानंतर ते डांगे चौकातील अमृत आयुर्वेदिक मेडिकल येथे गेले. त्यांच्याकडून २७ हजार रुपयांची औषधे घेतली. त्यानंतर त्यांनी डॉ. करीम यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे आढळून आले. तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like