धक्कादायक ! पुण्यात प्रभात रस्त्यावरील घरात कोरोनाबाधित प्रसिद्ध नेत्रतज्ञाचा मृतदेह आढळला; डॉक्टरच्या बहिणीचाही उपचारादरम्यान ससूनमध्ये मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येथील प्रभात रस्ता परिसरात एक डॉक्टर घरात मृतावस्थेत आढळून आले तर बहिनही घरातच बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूमागील कारण अस्पष्ट आहे. दरम्यान, डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

डॉ. सुबीर सुधीर रॉय ( वय ६८, रा श्वेता टेरेस भोंडे कॉलनी, प्रभात रोड डेक्कन) व गितीका सुधीर रॉय (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, डॉ. सुबीर रॉय हे नामवंत नेत्रतज्ज्ञ होते. डॉ. रॉय हे आपली बहिण गितीका व भाऊ संजय यांच्या बरोबर राहत होते. गितीका आणि संजय यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. रॉय यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. त्यामुळे शुक्रवारी त्यांचे नातेवाईक घरी आले असता त्यांना  हॉलमध्ये गितीका बेशुद्धावस्थेत आढळल्या तर संजय हे घरामध्येच दिसून आले. नातेवाईकांनी रॉय यांचा शोध घेतला पण मिळाले नाही. यावेळी एका खोलीतून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे तत्काळ पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी गितीका यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या मदतीने त्या रूमचा दरवाजा तोडण्यात आला असता स्वछतागृहात रॉय यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या तपासणीत रॉय कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्याचे डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले. तर शनिवारी गितीका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉ रॉय हे नामवंत नेत्रतज्ज्ञ  असून त्यांचे येरवडा आणि विश्रांतवाडी येथे क्लीनिक आहेत.