PPE Kits च्या तुटवड्यामुळे मोदी सरकारवर टीका करणार्‍या ‘त्या’ सरकारी डॉक्टराचा मृत्यू, झालं होतं निलंबन

विशाखापट्टणमः पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. दरम्यान गेल्या दीड वर्षापासून फ्रंटलाइन वर्कर्स म्हणून काम करणा-या डॉक्टरांना कधी मारहाण, शिवीगाळ, अपुरे पीपीई किट्स, अल्प वेतन, 12-18 तास शिफ्ट आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच गेल्या वर्षी पीपीई किट्स संदर्भात समस्या मांडलेल्या सरकारी डॉक्टराचा विशाखापट्टणमच्या एका रुग्णालयात कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे.

डॉ. के. सुधाकर असे मृत्यू झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. त्यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुले आहेत.

डॉ. सुधाकर यांनी पीपीई किट्स, मास्क आणि इतर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या साधनांच्या कमतरतेबाबत चिंता व्यक्त केली होती. डॉ. के सुधाकर यांनी पायाभूत सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान 8 एप्रिल 2020 रोजी त्यांचे निलंबन केले होते. मीडिया अहवालांच्या मते 16 मे रोजी पोलिसांनी त्यांच्याबरोबर हातापायी देखील केली होती. आंध्र प्रदेश हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वीच ते कोरोनातून बरे झाले होते. टाइम्स ऑफ इंडियाने त्यांचे एक मित्र पी. विजयकुमार यांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, या प्रकरणाचा अंतिम निर्णय 27 एप्रिल रोजी सुनावण्यात येणार होता. जेंव्हा याबाबत काहीच कळले नाही तेंव्हा ते नैराश्येत गेले होते. मीडिया अहवालांच्या मते, त्यांच्या कुटुंबीयांनी देखील गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्याशी सामना करत असल्याचे म्हटले आहे.