५ कोटींसाठी फलटणच्या प्रसिद्ध डॉक्टरचे अपहरण – 7 तासात सुटका

फलटण : पोलीसनामा ऑनलाईन – फलटणमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ संजय कृष्णाजी राऊत यांचे ५ कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. त्यांचे अपहरण केल्यानंतर अपहरण कर्त्यांनी त्यांचाच फोन वापरून ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळे फलटण शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. पोलिसांनी अवघ्या सात तासात त्यांची सुटका केली आहे. तर अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

डॉ. संजय राऊत हे फलटणमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ आहेत. ते मंगळवारी रात्री १० वाजता आपल्या दुचाकीवरून हॉस्पीटलमधून घरी जात होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या अज्ञातांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर अकरा वाजताच्या सुमारास राऊत यांच्या सिद्धनाथ हॉस्पीटलमध्ये त्यांच्याच मोबाईल क्रमांकावरून हॉस्पीटलच्या व्यवस्थापकाला फोन करून डॉक्टरांचे अपहरण केल्याचे अपहरणकर्त्यांनी सांगितले. त्यासोबतच चार ते पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर फलटण शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर  फलटण शहर पोलीस, बारामती पोलीस आणि सातारा जिल्ह्यातील सर्व यंत्रणा या तपासाला लागल्या. पथके तपासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या  एका धाग्याच्या आधारे त्यांचा शोध लावून पोलिसांनी डॉक्टर संजय राऊत यांची सुटका केली. तर सात जणांना ताब्यात घेतले आहे.

उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक नाळे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक दळवी, देसाई, आणि स्थानिक व गुन्हे शाखा, सायबर सेल, यांच्या पथकाने रात्रभर परिश्रम करून डॉक्टरांचाी सुटका केली. तर बारामती, इंदापूर पोलिसांनीही यात मोलाची मदत केल्याचे पोलिसांनी सांगितले.