डॉ. पायलच्या मृत्यूनंतर डॉक्टरांच्या पिळवणूकीचा मुद्दा चर्चेत

पोलीसनामा ऑनलाईन टीम– नायर रूग्णालयातील डॉ. पायल आत्महत्या प्रकरणानंतर डॉक्टरांवर वाढणारा कामाचा ताण, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा छळ हे मुद्दे चर्चेत आले आहेत. काही वरिष्ठ डॉक्टर एकत्र येत यावर गांभिर्याने चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे. याच मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी नायरच्या निवासी डॉक्टर असोसिएशनकडून पॅनल डिस्कशन ठेवण्यात आले होते.

या चर्चेमध्ये टाटा रूग्णालयाचे अकॅडमिक डायरेक्टर डॉ. श्रीपाद बनवली, केईएम रूग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख डॉ. शुभांगी पारकर, निवासी डॉक्टर संघटनेचे माजी अध्यक्ष आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा आणि ठाण्यातील राजीव गांधी रूग्णालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिरूद्ध माळगांवकर सहभागी झाले होते. या चर्चेत आपले विचार व्यक्त करताना निवासी डॉक्टरांचे माजी अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा म्हणाले, डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी त्रास होत असतो. कामाच्या ठिकाणी छळवणूक होणे म्हणजे काय हे नीट समजून घेतले पाहिजे. ज्युनियर डॉक्टरांवर कामाचा ताण असतो. त्यातच त्यांना न झेपणारे काम देण्यात येत असेल तर ते अयोग्य आहे.

शिवाय जाणून-बुजुन जर डॉक्टरांना इतरांसमोर किंवा रूग्णांसमोर अपमानास्पद वागणूक देण्यात येत असेल आपण यास कामाच्या ठिकाणी त्रास होणे, असे म्हणू शकता. डॉक्टरांना कामाचा ताण आहे. हा ताण कमी झालाच पाहिजे. यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. मुख्य म्हणजे डॉक्टरांना केवळ १२ तास काम करू दिले पाहिजे. त्याहून अधिक तास काम असेल तर त्यांना मध्ये ब्रेक देणे गरजेचे आहे. याशिवाय रूग्णालयातील प्रत्येक डॉक्टरांची ६ महिन्यांतून एकदा मानसिक आरोग्याची तपासणी झाली पाहिजे. जेणेकरून त्या विद्यार्थ्याला किंवा डॉक्टरला त्रास असेल किंवा त्याच्या मनात कोणते विचार सुरु आहेत हे समजण्यासाठी मदत होईल.

तर टाटा रूग्णालयाचे डॉ. श्रीपाद बनवली म्हणाले, डॉक्टरांवर कामाचा ताण आहे. जर कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना त्रास होत असेल तर एक गोष्ट प्रामुख्याने केली पाहिजे ती म्हणजे संभाषण. डॉक्टरांमधील, नर्सेसमधील याशिवाय वॉर्डबॉय यांच्यातील संभाषण वाढले पाहिजे. रूग्णालयात काम करणाऱ्या प्रत्येकाने एक टीम म्हणून काम केले पाहिजे. यासाठी ज्युनियर, सिनियर, वॉर्डबॉय, नर्स यांच्याशी योगयरित्या संवाद साधला पाहिजे. जेणेकरून एक टीम म्हणून काम करणे सोपे जाईल.

डॉ. शुभांगी पारकर म्हणाल्या, काम करताना औपचारिकता पाळायलाच हवी. मात्र कोणत्याही प्रकारचा छळ सहन करू नये. रूग्णालयातील टीममध्ये योग्य संवाद नाही हे सत्य आहे. अशा वागणुकीचे हे मूळ आहे. अशा परिस्थितीत हस्तक्षेप करणे, योग्यरितीने हाताळणे आणि पारदर्शकता ठेवणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, ज्यामुळे काही वाईट घटना टाळता येतील.