डॉक्टर खंडणी प्रकरण : पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी आणि एका महिलेसह 8 जणांवर मोक्कानुसार कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – डॉक्टरकडून खंडणी उकळल्याप्रकरणी शहर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यासह 8 जणांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस कर्मचारी समीर जगन्नाथ थोरात (वय 32), प्रदीप ज्ञानदेव फासगे (वय 37, शेवळवाडी, हडपसर), कैलास उर्फ नाना भानुदास अवचिते (वय 38), आरती प्रभाकर चव्हाण (वय 29, रा. फुरसुंगी) तसेच रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार आणि किरण माकर (सर्व रा. बारामती) अशी मोक्कानुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

समीर थोरात, प्रदीप फासगे, कैलास उर्फ नाना अवचिते आणि आरती चव्हाण हे चौघे अटकेत आहेत. तर इतर चोघे फरार आहेत. दरम्यान आज
पोलीस कर्मचारी समीर थोरात याच्या जामीनावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी होती. या सुनावणीच्या वेळी पोलिसांनी डॉक्टरांना खंडणी मागून त्यांच्याकडून ७ लाख रुपये उकळणाऱ्या म टोळीतील ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी समीर थोरात यांचे वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी जामिनासाठी न्यायालयात दाखल केलेला अर्ज काढून घेतला. आता मोक्काकोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहे, असे ठोंबरे यांनी पोलीसनामा ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ७ लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी ४ जणांना अटक केली आहे.

रंजना वणवे ही या टोळीची मुख्य सुत्रधार असून तिच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. ती प्रत्येक वेळी गुन्हा करताना वेगवेगळ्या लोकांचा वापर करते. यापूर्वी तिला बार्शी येथे अशाच प्रकारे डॉक्टरांकडून खंडणी वसुल केल्याप्रकरणात अटक केली होती. तेथे तिच्यावर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. त्या गुन्ह्यात ती सध्या जामिनावर बाहेर आली आहे. हे सर्व त्या टोळीमध्ये सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी मोक्का कारवाईला १ जुलै रोजी मंजुरी दिली आहे.

दरम्यान बारामतीच्या त्या चौघांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस कर्मचाऱ्यावर मोक्कानुसार कारवाई झाल्याने शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या पथकाने केली आहे.