Advt.

धक्कादायक ! तारेनं गळफास घेऊन डॉक्टराची आत्महत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करीत असलेल्या एका डॉक्टरांनी राहत्या घरी तारेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला आहे. डॉ. विजय नारायण जाधव (वय २६, रा. जळगाव) असे या डॉक्टरांचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विजय जाधव हे मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे राहणारे आहेत.

त्यांचे बी. ए. एम. एस.चे शिक्षण झाले आहे. गेल्या दीड वर्षांपासून गांधीनगर येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करीत होते. रिंग रोड येथे रहायला होते. बुधवारी दुपारपासून त्यांचे कुटुंबिय त्यांच्याशी संपर्क साधण्यात प्रयत्न करीत होते. मात्र त्यांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी जळगावमधील त्यांचे मित्र डॉ. गिरीश पाटील यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर त्यांना ते हॉस्पिटलला आले नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते त्यांच्या घरी गेले. घरी पाहिले असताना डॉ. विजय जाधव यांनी घरातील छताच्या हुकाला तारेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी ह्या प्रकाराची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना दिली. त्यांच्या घरात कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही़ त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.