कोरोना रुग्ण डोळ्यासमोर मरताना पाहून तरुण डॉक्टराची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशभरात कोरोना आपला विळखा दिवसेंदिवस घट्ट करीत आहे. दररोज मृत्यु पावणार्‍यांचा आकडा वाढत आहे. ऑक्सिजन, औषधांची टंचाई, उपचारासाठी साधा बेडही अशी देशभरात अवस्था झाली आहे. अशावेळी अहोरात्र रुग्णांवर प्रयत्न करणार्‍या डॉक्टर आणि परिचारिका यांच्या डोळ्यासमोर लोक प्राण सोडत आहेत. ते पाहून त्यांच्यावर मानसिक परिणाम होऊ लागला आहे.

आपण उपचार करीत असलेले रुग्ण एकापाठोपाठ दगावत असल्याचे पाहून एका तरुण कोरोना युद्धा डॉक्टरला सहन झाले नाही. त्याने आत्महत्या केल्याचा प्रकार दिल्लीत समोर आला आहे. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयातील निवासी डॉ. विवेक रॉय यांनी मालवीयनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

३५ वर्षांचे डॉ. विवेक रॉय ते मुळचे उत्तर प्रदेशाच्या गोरखपूरचे राहणारे होते. त्यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये लग्न झाले होते. त्यांची पत्नी आता दोन महिन्यांची गर्भवती आहे. डॉ. रॉय हे दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात डीएनबीचे पहिल्या वर्षीचे निवासी डॉक्टर होते. गेल्या महिन्याभरापासून ते कोरोना ड्युटीवर होते. याबाबत माजी आयएमए प्रमुख डॉ. समीर वानखेडकर यांनी ट्रवीट केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, डॉ. विवेक यांनी कोरोना काळात शेकडो जीव वाचवले आहेत.

आयसीयुमधील कोरोना रुग्णांच्या सेवेत ते होते. दररोज ते ८ रुग्णांना सीपीआर, एसीएलएस देत होते. त्यापैकी बहुतेक जण वाचले नाहीत. डोळ्यादेखत रुग्णांचा मृत्यु होत होता. अशा तणावपूर्व परिस्थितीत त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवट करण्यासारखा कठीण निर्णय घेतला. डॉक्टरांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी कुणावरही आरोप केलेले नाहीत. माझं कुटुंब आणि माझे मित्र आनंदी राहोत, असे म्हटले आहे. आपल्या आत्महत्येमागील कारण त्यांनी त्यात लिहिलेले नाही. मुलभूत आरोग्य सुविधांअभावी डॉक्टरांमध्ये तणाव वाढला आहे. त्यामुळे या तरुण डॉक्टरांचा मृत्यु सिस्टिमद्वारे झालेल्या हत्येपेक्षा कमी नाही, अशी टिका डॉ. वानखेडकर यांनी केली आहे.