Beed : धक्कादायक ! मुलगा होत नाही म्हणून 4 महिन्याच्या चिमुकलीसह पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, डॉक्टर पतीचे कृत्य

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –  तुला मुलगा का होत नाही, असे म्हणत पेशाने डॉक्टर असलेल्या पतीने 4 महिन्याच्या तान्ह्या मुलीसह पत्नीला रॉकेल ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सारुळ (जि. बीड) येथे घडली आहे. काडीपेटी भिजल्यामुळे दुसरी शोधेपर्यंत घरातून पळ काढल्याने पीडितेचा जीव वाचला आहे. मात्र चार महिन्याची चिमुकली तिथेच आहे. तिला वाचवा’ असा आक्रोश करत तीने टाहो फोडला.

या प्रकरणी पीडित प्रियंका घुगेच्या तक्रारीवरून पती डॉ विशाल घुगे या नराधमाविरोधात कळंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही.

याबाबतची माहिती अशी की, सारोळा (ता. केज, जि. बीड) येथील प्रियंका ढाकणेचा कळंब येथील येथील विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी 5 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पहिल्यांदा मुलगी झाल्याने प्रियंकाला घरात सासरच्याकडून मुलासाठी त्रास दिला जात होता. मात्र, पुन्हा एकदा प्रियंका गरोदर राहिल्यानंतर आता तरी मुलगा होईल या अपेक्षेने थोडा त्रास कमी झाला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा दुसरी मुलगी झाल्याने तेव्हापासून पती आणि सासरच्या मंडळीकडून तुला मुलगा का होत नाही म्हणून मारहाण शिवीगाळ शारीरिक मानसिक त्रास दिला जात असल्याचे पीडित प्रियांकाने सांगितले आहे.

तसेच जेवण करत असतानाही पोटभर जेवण देत नव्हते. माझ्या पहिल्या मुलीलाही त्रास देत दिला जात होता. आता चार महिन्याच्या मुलीला देखील त्रास देत आहेत. रात्री भांडण झाल्याने नवऱ्याने मला मारहाण करत माझ्या अंगावर व माझ्या लहान मुलीचा अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काडेपेटी भिजल्याने दुसरी शोधेपर्यंत मी पळ काढला मात्र माझी चार महिन्याची चिमुकली तिथेच आहे. वेदना असह्य होत असल्याने प्रियंकाला शासकीय जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचारार्थ दाखल केले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण अद्याप नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल झाले नाही. पिडीतेला एक अडीच वर्षांची मुलगी, दुसरी चार महिन्याची मुलगी असल्याचे तिच्या भावाने सांगितले.