डॉक्टर्स डे : आरोग्यमंत्री राजेश टोपेचं डॉक्टरांसाठी भावनिक ‘पत्र’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा काळात अनेकांना जीवनदान देण्यासाठी अविरत काम करणारे डॉक्टर्स जणू देवदूतच बनले आहेत. अशात आपल्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टरांचा दिवस म्हणजे ‘डॉक्टर्स डे.’ या निमित्ताने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांना शुभेच्छा देत एक भावनिक पत्र लिहलं असून, यातून त्यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला आहे.

राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट –

प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कोरोना संसर्ग काळात सर्वात आघाडीवर लढणाऱ्या डॉक्टरांसाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी एक सविस्तर पत्र लिहलं आहे. त्या पत्रात टोपे म्हणतात, “डॉक्टरांसाठी कुठला एक दिवस असू नये, कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोजच आपल्यात हवा असतो. सध्या सर्वत्र धार्मिक स्थळ बंद आहेत. मात्र, त्यातील देव कुठे असेल तर डॉक्टर्स तुमच्या रुपाने तो सर्वांना दिसतोय, अशी सार्वत्रिक भावना आहे. तसेच आपण मात्र, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात राहून त्यांच्या पाठीवर मायेचा हात देऊन त्यांना केवळ आजारातून बरे करीत नाहीत, तर मानसिक पाठबळ देऊन त्यांना उभं करीत आहात, तुमची ही मानवसेवा अमुल्य आहे.” असं आरोग्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे.

‘आज राज्यात दीड लाख कोरोनाबाधितांपैकी ९० हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन केलेल्या अथक प्रयत्नांचे हे फळ आहे. आपली कर्तव्य भावना जागृत ठेऊन कोरोनाशी लढायला आपण दररोज घराबाहेर पडता. तसेच आम्ही तुमची काळजी घेऊ पण तुम्ही घरीच सुरक्षित थांबा असा प्रेमाचा सल्ला देणाऱ्या तुम्हा डॉक्टरांच्या कार्याला सलाम’ ! अशा शब्दांत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांना शुभेच्छा देताना जनतेच्यावतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजेश टोपेंनी शेअर केला व्हिडीओ –

आज डॉक्टर्स डे निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा ! तसा तुमचा कुठला असा एक दिवस असू नये. कारण डॉक्टर्स नेहमीच देवासमान आहेत. कोविडसारख्या कठीण प्रसंगात डॉक्टर्स, नर्स, सफाईकर्मचारी, पोलीस, मीडियाप्रतिनिधी, यांनी जे कर्तव्य बजावलंय ते अतुलनीय आहे.

भारतात प्रतिवर्षी डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या सन्मानार्थ १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा करण्यात येतो. पण यंदा कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे डॉक्टरांचं महत्व अजून वाढलं आहे . सर्व डॉक्टरांना ‘डॉक्टर्स डे’ च्या शुभेच्छा.