चाललंय काय ? रूग्ण ऑक्सिजन ‘गॅस’वर अन् डॉक्टर गाणे ऐकत ओढतोय सिगारेट

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असताना अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. नगरहून पुण्याला हलविण्यात येत असलेल्या एका महिला रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात आला होता. मात्र, देखभालीसाठी सोबत देण्यात आलेले डॉक्टर सिगारेट ओढत होते आणि मोबाइलवर गाणी ऐकत असल्याचे समोर आले आहे. पुण्यात उपचार घेत असलेल्या या रुग्णाने आपल्या पतीला हा प्रकार सांगितल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे. रुग्णसेवेत हळसांड होत असल्याचा हा भयानक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

नगर शहरातील एका महिलेला श्वसानाचा त्रास होऊ लागला. सुदैवाने या महिलेची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र अधिक उपचारांसाठी तिला पुण्याला हलवण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे एका खासगी सुसज्ज रुग्णवाहिका घेऊन रुग्णाला पुण्याला हलवण्यात आले. पुण्यातील रुग्णालयात दाखल केल्यानंतर रुग्णामध्ये सुधारणा झाली.

रुग्ण महिलेने आपल्या पतीला रुग्णवाहिकेत घडलेला या भयंकर प्रकाराची माहिती दिली. महिलेला पुण्यात हलवण्यासाठी रुग्णवाहिकेला 20 हजार रुपये भाडे देण्यात आले होते. यामध्ये देखभालीसाठी डॉक्टर देखील होते. रुग्णाच्या शरिरात ऑक्सिजनची पातळी कमी असल्याने रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात आला होता. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्याची जबाबदारी डॉक्टरांची होती. मात्र, या महिलेने आपल्या पतीला सांगितले की, रुग्णवाहिकेतील डॉक्टर ए.सी. रुग्णवाहिकेत सिगारेट ओढत होते. मोबाइलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत होते. नगर ते पुणे या संपूर्ण प्रवासात रुग्णाकडे लक्ष देण्याऐवजी डॉक्टर स्वत:मध्ये दंग झाले होते. सुदैवाने प्रवासादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पत्नीने प्रवासादरम्यान घडलेला प्रकार पतीला सांगितल्यावर त्यांना धक्का बसला.पती नगरमध्ये एक स्वयंसेवी संस्थेमार्फेत सामाजिक कार्य करतात. शहरातील अनेक सार्वजनिक स्वरुपाची कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. कोरोनाच्या काळात उपाययोजना आणि त्यातील त्रुटींकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेळोवेळी वेधले आहे. पत्नीच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने त्यांनी याचा पाठपुरावा सुरु केला आहे. ज्या खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांना ही रुग्णवाहिका देण्यात आली होती, तेथील डॉक्टरांना त्यांनी ही माहिती दिली असून गंभीर रुग्णाला घेऊन जात असताना डॉक्टर एवढे निष्काळजीपणे कसे वागू शकतात, असा प्रश्न त्यांनी केला आहे.