प्रलंबित विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करा : खासदार सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बारामती मतदार संघातील प्रलंबित विकास कामांचे प्रश्न टाळेबंदीत शासनाने घालून दिलेल्या निर्देशाचे पालन करीत तातडीने मार्गी लावा अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. तसेच कोरोनाबाधीत रुग्णाला वेळेत उपचार मिळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती लोकसभा मतदासंघातील दौंड, बारामती, इंदापूर, मुळशी, भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली, खडकवासला तालुक्यातील प्रलंबित विविध विकासकामांचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बारामती तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेती व शेतीपूरक व्यवसायांचे झालेले नुकसान, घरे, जनावरांचे गोठे यांच्या पडझडीच्या अनुषंगाने शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा महामार्गासाठी संपादन करण्यात आलेल्या जमिनीबाबत मोबदला, निरा डाव्या कालव्यावरील घाटाची दुरुस्ती. इंदापूर तालुक्यातील मौजे कळंब येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या घरांचे प्रश्न मार्गी लावणे. दौंड तालुक्यातील नगर पालिकेच्या सफाई कामगारांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करुन देणे. वेल्हे तालुक्यासाठी नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालय, क्रिडा संकुल, प्रशासकीय इमारत उभारणी करीता लागणारी जागा, गुंजवणी, निरा देवधर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणे, भोर तालुक्यातील भाटघर धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे, मुळशी तालुक्यातील पुणे कोलाड राष्ट्रीय महामार्ग, पुरदंर तालुक्यातील जेजुरी येथे येणाऱ्या भाविकांसाठी नाझरे धरणाच्या काठावर घाट बांधणी, ग्रामपंचायत वाल्हे येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, नाझरे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कऱ्हा नदीवरील बंधारे दुरुस्ती, श्रीक्षेत्र जेजुरी आणि आळंदी देवस्थानांना ब वर्ग तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळणे, हवेली तालुक्यातील किरकटवाडी-नांदोशी रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ठ झालेल्या फुरसुंगी या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे, खडकवासला तालुक्यातील कात्रज ते नवले पुल राष्ट्रीय महामार्गावरील कामे पूर्ण करणे, खेड-शिवापूर टोलनाक्याचा प्रश्न मार्गी लावणे आदि विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.