शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ ! अनेकांना घेतला चावा, नागरिक भयभीत

अहमदनगर : पोलीसनाम ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. अनेक नागरिकांना चावा घेतल्याने मोठी घबराट पसरली आहे. मध्यरात्री शनी चौक परिसरात मोकाट कुत्र्याने तिघांना चावा घेतल्याचे समजते. असे असताना महापालिका प्रशासन बघ्याच्या भूमिकेतच आहे.

दोन दिवसांपूर्वीच सावेडी उपनगरात महाविद्यालयीन विद्यार्थिनी व इतरांना चावा घेतला होता. नागरिकांना मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतला जात आहे. शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम बंद असल्याने मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरातील अनेक नागरिकांना चावा घेतला आहे. सावेडी उपनगरासह शहरातील मध्यवस्तीतही मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम बंद आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच एका कंत्राटी कामगाराने ‘आम्हाला आरोग्य अधिकार्‍यांच्या शेतात कामाला पाठवले जात आहे. अनेक महिन्यांपासून आमचे पगार झाले नाही’, असे सांगितले होते. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली होती. परंतु आयुक्तांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.