अहमदनगर : पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ, तरुणीस चावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गुलमोहर रोड पोलिस चौकी जवळ आज सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने महाविद्यालयीन तरुणीचा चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याने परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना चावा घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांनी मनपा प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. महानगरपालिकेची कुत्रे पकडण्याची यंत्रणा संपूर्णपणे ठप्प आहे. कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सध्या कामबंद आंदोलन चालू केले आहे. महानगरपालिकेकडून कुत्रे पकडण्याबाबत कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. आता शहरात पिसाळलेली कुत्री कोण पकडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात या अशा कुत्र्यांमुळे इतर चांगले कुत्रे ही पिसाळू शकतात. त्याचा धोका नागरिकांच्या जिवाला होऊ शकतो. त्यामुळे महानगरपालिकेने याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like