काय सांगता ! होय, जुली बाळांतीन झाली अन् पठ्ठयानं चक्क 12 गावांना गाव जेवण दिलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम : मध्यप्रदेशातल्या सतना जिल्ह्यातील एका कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आपल्या प्रिय श्वानाने पाच पिलांना जन्म दिल्याने अत्यानंद झालेल्या मालकाने १२ गावांतील गावकऱ्यांना जेवणाचं निमंत्रण देऊन जेवणावळीच्या पंगती उठवल्या. मध्यप्रदेशातील सतना जिल्ह्यात एका पाळीव श्वानाने पाच पिलांना जन्म दिल्याने मालकाने खूश होऊन चक्क १२ गावच्या लोकांना जेवण दिलं.

या खास कार्यक्रमाच्या पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पत्रिकेद्वारे मालकाने १२ गावातील तब्बल २ हजार लोकांना आमंत्रण दिलं होतं. लोकांनीही दिलेल्या आमंत्रणाचा मान स्वीकारुन कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती. दरम्यान, केवळ जेवणाच्या पंगती उठवूनच पालक थांबला नाही. तर त्याने त्या कार्यक्रमात ऑर्केस्ट्राही ठेवला होता. सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. डान्स, गाणी असे कार्यक्रम रंगले.

मुस्तफा खान असं जुलीच्या मालकाचं नाव आहे. मुस्तफा खान यांना या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गावातील उमेश पटेल आणि आर. के. कुरील यांनी मदत केली होती. यावेळी उपस्थितांनी जुलीला भरभरुन आशीर्वाद दिले तसंच जुलीच्या मालकाच्या श्वानप्रेमाचं कौतुक केलं. या आशीर्वाद सोहळ्यानंतर लोकांना महाभोजन दिलं गेलं. शेकडो लोकांनी जेवणाला मोठी गर्दी केली होती.

श्वानाचे डोहाळे जेवण
एका पोलिस अधिकाऱ्याने चक्क घरी पाळलेल्या श्वानाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी शेजारी आणि नातेवाईकांना बोलावण्यात आले. विन्नीला सजवून पाळण्यात बसवले आणि केक कापून आनंदोत्सव साजरा केला. गर्भवती महिलेला डोहाळ जेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे विन्नीलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून हेअरस्टाईल करून नटवण्यात आले होते. तर परिसरातील महिलांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी विन्नीचे औक्षण करून ओटीही भरली. सध्या या डोहाळजेवणाची नागपुरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्राण्यांप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त केल्याबद्दल अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.