सोलापुरातील सर्व भटकी कुत्री तीन दिवसांनतर आली शुद्धीवर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अगोदर दोन-तीन दिवसांपासून पार्क चौक परिसरातील मोकाट कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन बेशुध्द करुन जाळीत पकडून कचरा गाडीतून नेण्यात आले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बेशुध्द अवस्थेत असलेली मोकाट कुत्री सध्या शुध्दीवर आली आहेत. त्यांना परत त्या-त्या ठिकाणी सोडण्यात आले.

कुत्र्यांची धरपकड करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी कार्यरत होते. जाळीमधून पकडून त्यांना इंजेक्शनद्वारे झायलेजिन आणि टिटामाईन देऊन त्यांना बेशुध्द करण्यात आले होते. महानगरपालिकेचे ३ कर्मचारी तसेच ५ कर्मचारी रोजगाराने लावण्यात आले होते. त्यांच्या मार्फत साधारणत शंभर-सव्वाशे कुत्र्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यामध्ये अनेकांच्या पाळीव कुत्र्यांचाही समावेश होता. पाळीव कुत्री असली तरी ती रस्त्यावर आल्यामुळे त्यांची धरपकड केल्याचे पाहिला कर्मचारी सांगत होते.

पंतप्रधानांच्या कॅन्व्हॉ मार्गवर पार्क चौक, डफरीन चौक, महापौर बंगला, रामलाल चौक, सरस्वती चौक, पार्क चौपाटी, सिध्देश्वर मंदिर परिसर, होम मैदान या ठिकाणच्या कुत्र्यांना पकडण्यात आले होते. पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी तक्रार केल्यानंतर त्यांना पुन्हा कुत्रे रस्त्यावर येऊ देऊ नका, अशी समज देऊन त्यांच्या कुत्र्याची सुटका केली होती. इंजेक्शनद्वारे बेशुध्द झालेली सर्व कुत्री आता शुध्दीवर आली. अखेर त्यांनीही मोकळा श्वास घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या ९ तारखेच्या सभेच्या धर्तीवर कॅन्व्हाचे मॉकड्रिल (प्रात्यक्षिक) घेत असताना हिराचंद नेमचंद वाचनालयाजवळ कॅन्व्हा आला असता एक कुत्रे अचानक आडवे गेलेच.