रत्नागिरी : मिऱ्याच्या समुद्रकिनारी डॉल्फिनचे ‘दर्शन’ !

रत्नागिरी: पोलीसनामा ऑनलाइन – कोकण म्हंटल की, आठवतो तो समुद्रकिनारा. प्रत्येक सुट्टीमध्ये कोकणची सफर ठरलेलीच असते. सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहे. त्यामुळे अनेकजण कोकणात जातात. सध्या मिऱ्या, नेवरे, काजिरभाटी, काळबादेवी किनारी डॉल्फिनचे दर्शन होऊ लागले आहे. किनाऱ्यापासून काही अंतरावर डॉल्फिनच्या झुंडी पाहायला मिळत आहेत.

गुहागर, हर्णै, मुरुड, कर्दे, दापोलीसह रत्नागिरी तालुक्‍यातील मिऱ्या, काळबादेवी, आरे-वारे जवळ डॉल्फिन माशांची झुंडच्या झुंड पाहायला मिळते. पारा घसरू लागल्यानंतर जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरवात झाली. या कालावधीत डॉल्फिन कोकणातील किनाऱ्यांवर पाहायला मिळतात. हा मासा शांत असून पाण्यातून पोहत जाताना पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. त्याचा कोणताही त्रास पर्यटकांना होत नाही. त्यामुळे अनेक पर्यटक किनाऱ्यावर सकाळच्या सत्रात गर्दी करतात.

पर्यटन व्यवसायाला चालना
समुद्रकिनाऱ्यावर असलेली सजीवसृष्टी पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होतात. त्यावर मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय चालतो. उष्मा वाढला की मासे खोल पाण्याकडे वळतात. अनेक होडीवाले हे मासे पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन समुद्रात जातात. त्यातून त्यांना आर्थिक उत्त्पन्न मिळते. एकूणच सुमद्रकिनारी पर्यटकांमुळेच येथील व्यवसायाला चालना मिळत असते. दरम्यान कोरोनामुळे पर्यटकांचा राबता कमी असला तरी पूर्वीचे पुन्हा दिवस येतील असे स्थानिकांनी सांगितले.

डॉल्फिनचा त्रास
एकीकडे डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत असले तरी याचा मच्छिमारांना फटका बसत असतो. मच्छीमारांच्या जाळ्यात डॉल्फिन मासे आले तर ते जाळे फाडून टाकतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. याचा सर्वाधिक त्रास गिलनेटधारकांना सहन करावा लागतो. अनेकवेळा जाळ्यात सापडलेली मासळीही ते मासे खाऊन टाकतात.