डोंबिवलीत आगीचे थैमान, अर्धा किलोमीटर परिसरातील घरं, शाळा केल्या रिकाम्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत आगीचे सत्र थांबता थांबत नाहीये. काल माझगाव आणि आज डोंबिवलीमध्ये आग लागण्याचे प्रकार घडले. आज डोंबिवलीमध्ये MIDC केमिकल कंपनीला भीषण आग लागली. ही कंपनी त्याच रस्त्यावर आहे जेथे काही दिवसांपूर्वी प्रदुषणामुळे रस्ते गुलाबी झाले होते. याच भागातील डोंबिवली एमआयडीसीमधील मेट्रोपॉलिटन कंपनीत ही भीषण आग लागली आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी बदलापूरमधील अग्निशमन दलाकडून मदत मागण्यात आली आहे. मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. डोंबिवली MIDC कडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कल्याण शीळ मार्गाचा तूर्तास वापर करु नये असे कल्याण डीसीपी विवेक पानसरे यांनी आवाहन केले आहे. चार तास उलटून गेले तरी अद्याप आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. आसपासच्या कंपन्यांमधील मंजूरांना देखील कंपन्यांमधून बाहेर काढण्यात आले आहे. परिसरातील रस्ते रिकामे करण्यात आले आहेत.

आग लागलेली कंपनी केमिकल कंपनी असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. या आगीच्या घटनेत जीवतहानी झालेली नाही परंतु आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जवळपासच्या सर्व नागरिकांना लवकरात लवकर घरं रिकामी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच डोंबिवलीकरांनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.