डोंबिवलीची अक्षया अय्यर ठरली ‘सूर नवा ध्यास नवा’ ची ‘राज’ गायिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – : ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातून अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकणारी डोंबिवलीकर अक्षया अय्यर ही या वर्षाची गायिका ठरली आहे. सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव पद्मश्री हरीहरानजी यांनी घोषित केले.

पाच महिन्याआधी २२ सुरवीरांचा सुरेल प्रवास सुरु झाला आणि यात स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले. शिलेदार रविंद्र खोमणे, स्वराली जोशी, अक्षया अय्यर, अमोल घोडके, राजू नदाफ, श्रावणी वागळे हे मंचाला शिलेदार मिळाले. आज या स्पर्धकांमध्ये सूर नवा ध्यास नवा – स्वप्न सुरांचे स्वप्न सार्‍यांचे कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा होता. अक्षया अय्यरने या सहा जणांमधून बाजी मारली. सूर नवा ध्यास नवाच्या विजेत्याच नाव पद्मश्री हरीहरानजी यांनी घोषित केले.

कलर्स मराठीतर्फे अक्षया अय्यरला दोन लाख रुपये, केसरी टुर्सतर्फे सिंगापूरची टुर आणि वामन हरी पेठे सन्स यांनी डिझाईन केलेली मानाची सुवर्णकट्यार मिळाली. तसेच स्वराली जोशी, रविंद्र खोमणेला, राजू नदाफ, अमोल घोडके, श्रावणी वागळे या उपविजेत्यांना कलर्स मराठीतर्फे एक लाख रुपयांचा चेक आणि ट्रॉफी, तसेच केसरी टुर्सतर्फे उपविजेते, कॅप्टन्स, सूत्रसंचालक यांना गिफ्ट व्हाऊचर मिळाले आहेत.

या सूर नवा ध्यास नवा, कार्यक्रमात अमोल घोडकेचा बुलंद आवाज, लिटल वंडर अक्षया अय्यरचे कुठलेही गाणे सहज गाण्याची कला, मराठवाड्याचे खणखणीत नाणे रविंद्र खोमणे, जिच्या ध्यानीमनी सतत असतात गाणी अशी श्रावणी वागळे, जिच्या आवाजाची खुमारी सर्वांपेक्षा निराळी अशी स्वराली जोशी, आणि मिलाफ राजू नदाफ यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या सहा स्पर्धकांनी एका पेक्षा एक सुरेल स्पर्धकांना मागे टाकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. महेश काळे आणि अवधूत गुप्ते याच्या गाण्यांनी स्पर्धक आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उपस्थितांना महेश काळे यांनी गाण सादर करून भारावून टाकले होते.

कलर्स मराठीच्या परिवारातील प्रेक्षकांचे लाडके कलाकार कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी आणि स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आले होते. जीव झाला येडापिसा, स्वामिनी, बाळूमामाच्या नावानं चांगभलं सुखाच्या सरींनी हे मन बावरे, मालिकेमधील कलाकारांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये उपस्थिती होते.