2000 ते 18600 रूपयांपर्यंत विमानाची तिकीटे, जाणून घ्या रूट आणि दराबाबतचं गणित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे सेवा चालू केल्यानंतर केंद्र सरकारने देशांतर्गत प्रवासी उड्डाण सेवेला परवानगी दिली आहे. सरकारच्या निर्णयानुसार, २५ मेपासून हवाई प्रवास सुरू केला जाईल. यादरम्यान प्रवाशांना अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतील. प्रवाश्यांसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत, ज्यात विमानतळावर चेक-इनची व्यवस्था नसणे देखील समाविष्ट आहे. यासह हवाई प्रवासाचे भाडे रोखण्यासाठी देखील सरकारने किमान व जास्तीत जास्त हवाई भाडे मर्यादा निश्चित केली आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, हवाई प्रवासाच्या भाड्यांची मर्यादा प्रवासाच्या वेळेच्या आधारावर ७ भागात विभागली गेली आहे. हे भाडे पुढील तीन महिन्यांपर्यंत म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत लागू असेल. याचा अर्थ असा की, विमान कंपन्या स्वत:च्या मर्जीने भाडे वाढवू शकणार नाहीत आणि प्रवाशांना कमी भाड्यात प्रवास करण्याची सोय मिळेल. सरकारी सूचनांनुसार विमान कंपन्यांना सरासरी दराने ४० टक्के प्रवासी तिकिटांची विक्री करणे बंधनकारक असेल. हे भाडे सुमारे ६,७०० रुपये असेल. सरकारने विमान कंपन्या, विमानतळ आणि इतर क्षेत्रांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

हवाई प्रवासासाठी किती भाडे असेल…

सरकारने ७ भाग तयार केले आहेत. यात ४० मिनिटांपेक्षा कमी प्रवास करणारी उड्डाणे प्रथम असतील. या कालावधीसाठी उड्डाणांचे किमान भाडे २,००० रुपये आणि जास्तीत जास्त भाडे ६,००० रुपये असेल.

४० ते ६० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा २,५०० ते ७,५०० रुपये पर्यंत असेल.
६० ते ९० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ३,००० ते ९,००० रुपयांपर्यंत असेल.
९० ते १२० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ३,५०० ते १०,००० पर्यंत असेल.
१२० ते १५० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ४,५०० ते १३,००० पर्यंत असेल.
१५० ते १८० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ५,५०० ते १५,७०० रुपये असेल.
१८० ते २८० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ६,५०० ते १८,६०० रुपये पर्यंत असेल.