‘विमानात सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर’, ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केला धक्कादायक अनुभव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प झालं आहे. सिनेमांची आणि टीव्ही मालिकांची शुटींगही गेल्या अनेक दिवसांपासून बंदच होती. हळूहळू सारं काही अनलॉक होत आहे. पुन्हा एकदा शुटींगला सुरुवात होत आहे. यामुळं गावी गेलेले कलाकार आता पुन्हा मुंबईत परत येताना दिसत आहेत. टीव्ही अभिनेत्री डोनल बिष्ट हिनं विमानातून प्रवास केल्यानंतर सोशल डिस्टंसिंगबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

डोनल बिष्ट तिची आगामी वेब सीरिज द सोचो प्रोजेक्ट च्या शुटींगसाठी मुंबईत आली आहे. विमान प्रवास करताना पीपीई किट्स नसल्यानं तिला खूप असुरक्षित वाटत होतं असंही तिनं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना डोनल म्हणाली, “मुंबईत येण्यासाठी मी ज्या विमानाचं तिकीट काढलं होतं ते रद्द झालं. त्यानंतर मला दुसऱ्या विमानानं प्रवास करावा लागला. हा अनुभव खूपच वाईट होता. मुंबईत सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळले जात नव्हते. दोन प्रवाशांमध्ये एका सीटचं अंतर नव्हतं. आम्हाला पीपीई किट्सही देण्यात आले नव्हते. विमान कंपन्यांच्या या बेजबाबदारपणामुळं मला खूप असुरक्षित वाटत होतं.” असं डोनल म्हणाली.

डोनलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती द सोचो प्रोजेक्ट या आगामी वेब सीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. डोनलनं 2014 साली आलेल्या एअर लाईन्स या मालिकेतून रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं कलश- एक विश्वास, एक दीवाना था, रूप- मर्द का नया स्वरूप, दिल तो हॅप्पी है जी अशा अनेक मालिकेत काम केलं.