‘त्या दिवशी लोकांना अर्धवट माहिती दिली ! डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती गंभीर होती’ : White House

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती शुक्रवारी गंभीर होती अशी धक्कादायक माहिती व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज यांनी दिली आहे. कोरोनाचं निदान झाल्यांतर ट्रम्प यांच्या प्रकृती विषयी जनतेला अर्धवटच माहिती देण्यात आली होती. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलायनिया ट्रम्प यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

मार्क मीडोज यांनी शनिवारी रात्री प्रसारीत झालेल्या फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. यात 74 वर्षीय राष्ट्राध्यक्षांच्या तब्येतीविषयी जी माहिती लोकांसमोर आली त्यात विरोधाभास असल्याचं समोर आलं आहे.

मीडोज म्हणाले, “ट्रम्प यांना सध्या ताप नाहीये आणि त्यांची ऑक्सिजन लेव्हलही चांगली आहे. मात्र काल आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता लागली होती. त्यांना ताप आला होता आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी वेगानं खाली येत होती. असं असूनही राष्ट्रपती उभे राहून चालू लागले.”

मीडोज म्हणाले, काल सकाळपासून (जेव्हा आम्ही सर्वजण त्यांच्या आरोग्याबद्दल काळजी घेत होतो) तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होत आहे.

‘अमेरिकेला अजून महान बनवायचंय’ : डोनाल्ड ट्रम्प
कोरोनाची लागण झालेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची तब्येत चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, “परत येण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेत आहोत. मला परत यावंच लागेल. कारण आम्हाला अमेरिकेला आणखी महान बनवायचंय. त्यासाठी प्रेरणा खूप आवश्यक आहे. एकत्र येऊन काम करा आणि ते पूर्ण करा” असं ते म्हणाले आहेत.