डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रतिनिधीगृहात महाभियोग मंजूर, कारकिर्दीत दोनदा महाभियोग येणारे पहिलेच राष्ट्राध्यक्ष

वाशिंग्टन : कॅपिटल हिल येथे गेल्या आठवड्यात झालेल्या प्राणघातक हिंसाचाराबद्दल अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्यास मंजूरी दिली आहे. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर महाभियोगाविरुद्ध १९७ जणांनी मतदान केले. ट्रम्प (Donald Trump) यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या १० सदस्यांनीही महाभियोगाच्या बाजूने मतदान केले. चार जण तटस्थ राहिले. यामुळे अमेरिकेच्या इतिहासात दोनदा महाभियोग दाखल झालेले ट्रम्प (Donald Trump) हे एकमेव अध्यक्ष ठरले.

अमेरिकेत दुपारी साडेचारच्या दरम्यान (भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या दरम्यान) हा प्रस्ताव मंजूर झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांच्या शपथविधीस आणि सूत्रे हाती घेण्यास अवघा आठवडा राहिला असताना, हा निर्णय झाला आहे. आता पुढील प्रक्रिया सिनेटमध्ये चालेल. मागील बुधवारी शेकडो ट्रम्प समर्थकांनी कॅपिटोल इमारतीकडे कूच केल्याने हा अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासातील काळा बुधवार ठरला होता. त्यानंतर या बुधवारी (ता. १३) ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा निर्णय तेथील प्रतिनिधी सभागृहाने घेतला आहे.

ज्या रिपब्लिकन पक्षाच्या १० सदस्यांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले त्यात वॉशिंग्टनचे डॅन न्यूहाउस, न्यूयॉर्कचे जॉन दक्षिण कॅरोलिना, कॅलिफोर्नियाचा डेव्हिड वलादाओ, कॅटको, वॉशिंग्टनचे जैम हॅरेरा ब्यूटलर, इलिनॉयचे अ‍ॅडम किन्झिंगर, मिशिगनचे फ्रेड अप्टन, मिशिगनचे पीटर मेजेर, ओहियोचे अँथनी गोंजालेज, टॉम राइस यांचा समावेश आहे.