ट्रम्प यांच्या हाय प्रोफाईल दौऱ्यासाठी गुजरात सरकार प्रति मिनिट करतेय ‘एवढा’ खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. 24 फेब्रुवारीला ट्रम्प गुजरातला भेट देणार आहे. ट्रम्प यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी गुजरात सरकारने कोणतीही कसर ठेवली नाही. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी राज्य सरकार 100 कोटींपेक्षा जास्त खर्च करणार आहेत. म्हणजेच एका मिनटासाठी गुजरात सरकार 55 लाख रुपये ट्रम्प यांच्या स्वागतासाठी खर्च करणार आहे. त्यानुसार ट्रम्प यांच्या दौऱ्याची तयारी जोरात सुरु आहे.

या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे 22 किमीचा रोड शो करणार आहेत. यानंतर हे दोन्ही नेते विमानतळाजवळील इंदिरा ब्रीज, एसपी रिंग रोड मार्गे मोटेरा येथील नव्याने तयार झालेल्या क्रिकेट स्टेडियमवर पोहचतील. हा संपूर्ण प्रवास मार्ग सजविला जात आहे. दुभाजक रंगविले जात आहेत आणि रस्त्यांच्या दुतर्फा फुले लावली जात आहेत. यासाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्यामुळे 17 रस्त्यांवर गिट्टी व डांबराचे नवीन थर देण्यात आले असून मोटेरा स्टेडियमचे उद्घाटन झाल्यानंतर विमानतळाकडे जाण्यासाठी 1.5 किमीचा रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्यासाठी 60 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढेच नाही तर 12 ते 15 कोटी रुपये ट्रम्प यांच्या संरक्षणासाठी खर्च केले जाणार आहेत. मोटेरा स्टेडियमवर आयोजीत ‘केम छो ट्रम्प’ कार्यक्रमात भाग घेणाऱ्या 1 लाखाहून अधिक लोकांच्या वाहतूक आणि न्याहारीसाठी 7 ते 10 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

You might also like