Donald Trump India Visit : …तर ही अत्यंत दुर्दैवी बाब, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जितेंद्र आव्हाडांचा ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्‍यावर असून आज सकाळी अहमदाबाद येथे सकाळी त्यांचे आगमन झाले. सकाळी ट्रम्प कुटुंबियांनी महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. परंतु, या भेटीत ट्रम्प यांनी महात्मा गांधींचा उल्लेख न केल्याने विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही गांधीजींचा उल्लेख टाळणार्‍या ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

आव्हाड म्हणाले की, साबरमती आश्रम ज्यांच्या नावामुळे ओळखला जातो, त्या महात्मा गांधींचा साधा उल्लेखही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही. ट्रम्प यांना जर भारताचा इतिहास माहित नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मी ट्रम्प यांचा निषेध करतो, असे आव्हाड म्हणाले.

https://twitter.com/AwhadOffice/status/1231922252540674052

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याकडे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे कुटुंबासह तसेच वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी प्रतिनिधी मंडळासोबत सकाळी 11.30 वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभाई पटेल विमानतळावर आगमन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: विमानतळावर जाऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत केले.

यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विमानतळावरुन थेट महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात पोहचले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आश्रमातील विविध वस्तू आणि आश्रमाची माहिती दिली. येथे ट्रम्प यांनी पत्नीसह चरख्यावर सूत कताई केली. यानंतर साबरमती आश्रमातील अभिप्राय नोंद वहीत ट्रम्प यांनी अभिप्राय लिहिताना म्हटले की, “टू माय ग्रेट फ्रेंड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी… थँक्यू फॉर दिस वंडरफुल व्हिजिट.” ट्रम्प यांच्या या अभिप्रायावरून आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. कारण त्यांनी आपल्या अभिप्रायात महात्मा गांधींच्या नावाचा कोणताही उल्लेख केला नाही. यामुळे विरोधकांनी आता टीका सुरू केली आहे.