प्रेस सेक्रेटरीनं ट्रम्प यांच्या खासगी बँक अकाऊंटची माहिती केली सार्वजनिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या परिणामांमुळे अमेरिका खूप त्रस्त आहे आणि यामुळेच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तेथील लोक निशाणा साधत आहेत. पण प्रेस सेक्रेटरीने चुकून खासगी बँक खात्याची माहिती सार्वजनिक केली तेव्हा ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रेस सेक्रेटरी Kayleigh McEnany पत्रकारांना कोरोना व्हायरसबाबत राष्ट्रपतींकडून केल्या गेलेल्या कामाबाबत आणि निर्णयाबद्दल माहिती देत होती. त्यावेळी कागदपत्रे दाखवत असताना त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी बँक खात्यांची माहितीही चुकून सार्वजनिक केली.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत त्यांची सचिव Kayleigh McEnany ने घोषणा केली की राष्ट्रपती ट्रम्प कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी आपल्या तिमाही वेतनाचा धनादेश आरोग्य आणि मानव सेवा विभागाला देतील.

व्हाईट हाऊस मध्ये प्रेस सचिव जेव्हा देणगी देणारा १ लाख डॉलर्सचा धनादेश पत्रकारांना फोटो काढण्यासाठी दाखवत होती, त्याचवेळी ट्रम्प यांच्या खासगी बँक खात्यांविषयीची माहितीही चुकून सार्वजनिक झाली.

एका अधिकाऱ्याने या घटनेबद्दल सांगितले की, “ते आपले वेतन या विषाणूच्या आजाराशी उपचारांत मदत करण्यासाठी देत होते, पण माध्यमांनी या गोष्टीला महत्त्व देण्याऐवजी त्याचे लाजीरवाणे कारण शोधून काढले, तथ्य सांगण्याऐवजी चेक खरा आहे की नाही यावर लक्ष केंद्रित केले गेले.”

मात्र एकदा खाजगी माहिती सार्वजनिक झाल्यावर दुसऱ्यांकडून त्याची हॅकिंग होण्याचा धोका असतो.